सतीश पाटणकर
आंबा व काजू ही पिके सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखली जातात. या दोन्ही फळ उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याने देशाला परकीय चलनही मिळते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून आंबा व काजू उत्पादनाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसत आहे. लांबलेला पावसाळा, थंडीचा अभाव, ढगाळ वातावरण व आताच पडलेला अवकाळी पाऊस याचा विपरीत परिणाम आंबा व काजू उत्पादनावर होण्याची भीती आहे. आंबा कलमांना मोहोर येण्याची प्रक्रियाच लांबल्याने हापूसचे आगमन किमान दीड ते दोन महिने उशिराने झाले. शिवाय प्रतिकूल परिस्थिती पाहता आंबा व काजूचे उत्पादन या वर्षीही पूर्ण क्षमतेने आलेले नाही. हापूस बाजारपेठेत उशिरा दाखल झाल्याने त्याला योग्य दरही नाही. गतवर्षाप्रमाणेच या वर्षीही आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे कोकणात ऑक्टोबर महिन्यापासून थंडी जाणवायला सुरुवात होते. या थंडीमुळे आंबा, काजूला मोहोर फुटू लागतो. या पहिल्या टप्प्यातील मोहोराचा आंबा सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बाजारात येतो. मात्र या वर्षी पावसाळाच नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने आंबा, काजू उत्पादनाचे वेळापत्रकच बिघडले. नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात काहीशी थंडी जाणवल्याने आंबा, काजू कलमांवर मोहोर दिसू लागला. मात्र डिसेंबर सुरू होताच थंडी अचानक गायब झाली. ढगाळ वातावरण तयार झाले. सरासरी तापमानही वाढले व त्यात कहर म्हणजे गेल्या चार दिवसांत जिल्हाभरात अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे आंबा, काजू उत्पादनाचे वेळापत्रक व अर्थकारण पुरते कोलमडले आहे.
ऊन तापू लागलं की, वेध लागतात आंब्याचे. त्यातही खवय्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो तो कोकणातला हापूस! हापूसची चव चाखल्याशिवाय आंब्याचा सीझन ‘साजरा’ होऊच शकत नाही. अल्फान्सो ई-अल्बुकर १६व्या शतकात गोव्यात आला आणि त्याने नजीकच्या रत्नागिरी प्रांतात आंब्याची आगळ्या-वेगळ्या जातीची झाडे आणली. तोच जगप्रसिद्ध हापूस. हापूस सुरुवातीला रत्नागिरीत आला. पण देवगडात तो अधिक विसावला. आज देवगड ही हापूसची राजधानी ठरली आहे. देवगड हापूसच्या बरोबरीने रत्नागिरी हापूसही जगभर ओळखला जातो. अद्याप देवगडच्या हापूसला विश्वात कुणी धक्का लावलेला नाही. हापूसला हा जो मान मिळालाय, तो त्याच्या अद्भुत चवीनं… रसाळपणानं. हवाहवासा वाटणारा हा हापूस फळांचा राजा ही ओळखसुद्धा टिकवून आहे आणि राजाचे फळ हे त्याच्या किमतीमुळे म्हटले जातेय. गेल्या ५० वर्षांत हापूसची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर रायवळ आंबा मागे पडू लागलाय.
देवगड खालोखाल वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि रत्नागिरी, राजापूर, लांजा या भागांत हापूसच्या बागा तयार होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून हापूस नोव्हेंबरमध्ये किंवा आधीही बाजारात येतो. हापूसची पहिली पेटी बाजारात रवाना होणे हे अप्रूप. हापूस दर वर्षी पीक देत नाही. एक साल आड पीक देणारे हे फळ आहे, जगभर या फळाचे कौतुक होत असले तरी या पिकाचे अर्थकारण चमत्कारिक आहे. एका हापूसची फळ काढणी दर मोसमात १० वेळा करावी लागते. एकाच वेळी सर्व फळे तयार होत नाहीत. हा फरक जाणकारांनाच कळू शकतो. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वाधिक हापूसलाच बसतो. फळांचा राजा असला तरी निसर्गापुढे या राजाचा रुबाब चालत नाही. सिंधुदुर्गातून ६० हजार टन आंबा मुंबईकडे रवाना होतो, त्यातला ३० टक्के हा केवळ देवगडातून जातो. एकूण हापूसमधला २० ते ३० टक्के कॅनिंगला जातो. रत्नागिरीमधून नियमित चारशे ते पाचशे छोट्या-मोठ्या गाड्या आंबापेट्यांची वाहतूक करतात. मुंबई, पुणे मार्केटला नियमित सुमारे ७५ हजार ते एक लाख पेट्या दाखल होतात.
मुंबई मार्केटमध्ये जाणाऱ्या आंब्यांपैकी ५० टक्के आंबा हा आखाती आणि युरोपियन देशांमध्ये जातो. यातून सुमारे २०० ते ३०० कोटींचे परकीय चलन मिळते. देशांतर्गत बाजारपेठेमधूनही आंब्याची एवढीच उलाढाल होते. आंब्याबरोबरच या वर्षी काजू पीकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले काजू पीक धोक्यात आले आहे. काजूचे यंदा जेमतेम ५० टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कोकणात आंबा आणि काजू ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लावण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. मात्र प्रतिकूल हवामान,
वादळसदृश स्थिती याचबरोबर सातत्याने असणारे मळभ याचा परिणाम काजूला तसेच आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर झाला. पहिल्या टप्प्यातील मोहर येण्यास जवळपास जानेवारी महिना उजाडला आणि हा मोहर ढगाळ हवामानामुळे काळा पडून गळून गेला. वातावरणाच्या विपरीत परिणामामुळे या वर्षी पिकाला अपेक्षित दर मिळेल की नाही? याबाबतही शेतकरी चिंतेत आहेत. काजूच्या उत्पादनावर परिणाम झाला की, कारखानदार परदेशी काजू बीची आयात करतात. यामुळे बाजारपेठेतील मागणी घटली, तर काजू बीचा दर कोसळण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कातळावर हापूस दिमाखात उभा असला तरी आंबा उत्पादक शेतकरी मात्र या कातळावर आर्थिकदृष्ट्या उभा राहू शकत नाही. एकूणच हापूसचे अर्थकारण शेतकऱ्यांच्या फारसे हिताचे नाही. हापूसच्या फळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातूनही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. युवक रोजंदारीला मुंबईकडे जात आहेत. हापूसचे अर्थशास्त्र या बेरोजगारांना थोपवू शकत नाही. १०० टक्के अनुदानावर आंबा, काजू लागवडीची योजना आखली गेली. मात्र फळबागांना मिळणारे अनुदान बाग उभी करायला पुरत नाही. त्यामुळे त्याचा लाभ पैसेवालेच घेऊ शकतात. देवगडचा हापूस डौलात जगाच्या बाजारपेठेत उभा आहे. मात्र तो देवगडच्या सड्यावर ठामपणे उभा राहू शकत नाही. त्यासाठी प्रयत्न हवेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…