वाडा (वार्ताहर) : भिवंडी – वाडा महामार्गावर नेहरोली येथे शनिवारी सकाळच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेत दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले असून, दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाडा-भिवंडी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू आहे. लोखंडाने भरलेला ट्रक (क्रमांक डीएन. ०९ आर. ९६६५) हा वाड्यातून कुडूसच्या दिशेने जात असताना गॅस वाहतूक करणारा ट्रक (एमएच ०५ डीके ७७९२) समोरच्या दिशेने येऊन लोखंड वाहतूक करणाऱ्या
ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झाला.
लोखंड घेऊन जाणारा ट्रकचालक विनोद कुमार यादव व दुसऱ्या ट्रकचा चालक दिलबाबहादूर थापा हे दोघेही जखमी झाले. विनोदला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सुरत येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे, तर थापा याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.