मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी मुंबईत दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना रंगेल. रिषभ पंतच्या दिल्लीने मागील सामन्यात हैदराबादला २१ धावांनी हरवून त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासह दिल्ली १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. त्यामुळे त्यांना काहीही करून चेन्नईविरुद्ध दिल्लीला विजय आवश्यक आहे. दुसरीकडे, गत सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून १३ धावांनी पराभूत झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीचा सुपर किंग्ज स्पर्धेतून परतीच्या उंबरठ्यावर आहे.
धोनीने कर्णधार म्हणून पुनरागमन केल्यामुळे, सीएसकेला नशीब बदलण्याची आशा होती; परंतु या हंगामात गतविजेत्यांकडे सातत्य राहिले नाही. यलो ब्रिगेडने दहापैकी सात गेम गमावले आहेत आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत; परंतु ते आता मुंबई इंडियन्सप्रमाणेच उर्वरित सामन्यांमध्ये इतर संघांचे प्ले-ऑफचे भवितव्य बिघडवू शकते.
दिल्ली कॅपिटल्सला अंतीम चारमध्ये जाण्यासाठी सलामीची कोंडी फोडावी लागेल. अर्थात त्यासाठी त्यांना धडाकेबाज वॉर्नरसाठी सक्षम सलामीचा जोडीदार द्यावा लागेल. कॅपिटल्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांच्या उर्वरित चारपैकी किमान तीन सामने जिंकण्याची गरज आहे. गत सामन्यातील विजयामुळे कॅपिटल्स चेन्नईविरुद्ध या सामन्यात विजयी होण्यासाठी आवश्यक आत्मविश्वासाने उतरेल.
ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई. वेळ : रात्री ७.३० वाजता.