सुकृत खांडेकर
हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांनी गेले तीन आठवडे महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. मशिदींवरील भोंगे हा काही नवीन विषय नाही. पण हनुमान चालिसा प्रथमच राजकीय व्यासपीठांवरून आणि टीव्ही चॅनेल्सवरून झळकत राहिला. मशिदींवरील लाऊडस्पीकर आणि रस्त्यावर पढला जाणारा नमाज या विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आवाज उठवला होता. ठाकरे सरकार राज्यात स्थापन झाल्यावर मशिदींवरील भोंग्याच्या आवाजावर वेळीच निर्बंध लादले गेले असते, तर राज ठाकरे यांना, आज नही तो कभी नही, असा इशारा देण्याची वेळच आली नसती.
हनुमान चालिसावरून राज ठाकरे आणि नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी ठाकरे सरकारला मोठे आव्हान दिले. हनुमान चालिसा व मशिदींवरील भोंगे यावरून हिंदू जनतेला भावनिक आवाहन केले. या दोन्ही मुद्द्यांवरून जनतेची राज आणि राणांना सहानुभूती मिळाली तरी सरकार पडणार नाही याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्ण खात्री होती. सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर केला नसता तरी ही आंदोलने फार काळ चालली नसती हे राज ठाकरे व राणा दाम्पत्यालाही ठाऊक असावे. राज आणि राणा दाम्पत्याने केलेल्या आंदोलनामुळे गेली दोन वर्षे सुस्तावलेल्या शिवसेनेला जाग आली. शिवसैनिकांना घरातून रस्त्यावर येण्यास एक निमित्त मिळाले. हनुमान चालिसावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले. आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये, अशी शिवसेनेने ठाम भूमिका मांडली. एका हिंदी वृत्तवाहिनीवर हनुमान चालिसावरून सुरू झालेल्या आंदोलनावर चर्चा चालू होती. शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या तावातावाने बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ताही भाजपच्या प्रवक्त्यावर तुटून पडत होता. तुम्हाला हनुमान चालिसाविषयी एवढे प्रेम आहे, तर दोन ओळी तरी म्हणता येतात का, असे शिवसेनेच्या प्रवक्त्याने भाजपच्या प्रवक्त्याला आव्हान दिले. भाजपचा प्रवक्ता मुस्लीम होता. त्याला काय चालिसा येणार असे सेना – राष्ट्रवादीला वाटले. पण त्या मुस्लीम प्रवक्त्याने तोंडपाठ असलेला हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली, तेव्हा आघाडीच्या प्रवक्त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. भाजपच्या मुस्लीम प्रवक्त्याने चालिसाच्या चार ओळी स्पष्ट आवाजात म्हणून दाखवल्या व पुढच्या दोन ओळी तुम्ही म्हणून दाखवा, असे त्याने शिवसेना व राष्ट्रवादीला आव्हान दिले. तेव्हा मात्र त्यांची बबब झाली. तुम्ही कोण सांगणार, आमचा धार्मिक मुद्दा आहे, असे सांगून त्यांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.
देवदेवतांच्या आरतीला, महाआरतीला किंवा स्तोत्रपठणाला निदान सरकारने तरी विरोध करायला नको होता. पोलिसांच्या बळावर सार्वजनिक जागी होणारी महाआरती आणि स्तोत्रपठण बंद पाडता येतील. पण तशीच कारवाई बेकायदा मशिदींवरील बेकायदा भोंगे उतरविण्यासाठी सरकार करू शकेल काय? हाच कळीचा मुद्दा आहे. हनुमान चालिसाचे पठण आणि भोंगे विरोधी आंदोलन हाताळताना ठाकरे सरकारला मोठी कसरत करावी लागली. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून ठाकरे सरकारवर रोज तोफा धडाडत असतातच. पण मनसेचे प्रमुख राज ठाकरे व अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याभोवती टीव्हीचे कॅमेरे सतत पंधरा दिवस फिरत होते. पोलिसांच्या बळाचा वापर करून मनसेचे आंदोलन दडपण्याचा आणि राणा दाम्पत्याला जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकारने केला. राज ठाकरे आणि राणा दाम्पत्याला भाजपची सी किंवा डी टीम म्हणून हिणवले गेले. त्यांचे आंदोलन हाताळताना मोठा पोलीस फोर्स वापरला गेला. राणा दाम्पत्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला तेव्हाच अनेकांना आश्चर्य वाटते. कोणाच्या दबावाखाली की, कोणाला खूश करण्यासाठी पोलिसांनी एवढी कठोर कलमे लावली? राजद्रोहाची कलमे चुकीची लावली, असे सत्र न्यायालयाने स्पष्ट म्हटले.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करताना पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे मारले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पढण्याचे दाम्पत्याने जाहीर केले होते. पण पोलिसांचा फौजफाटा व शिवसैनिकांचा जमाव यापुढे त्यांना मुंबईतील पश्चिम उपनगरातील खारमधील घरातून बाहेरही पडता आले नव्हते. अमरावती ते लीलावती हाॅस्पिटल व्हाया भायखळा व तळोजा जेल असा या दाम्पत्याचा प्रवास झाला. मशिदींवर भोंगे हवेतच कशाला, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत, मग हाच मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची इच्छा ठाकरे सरकार पूर्ण करणार की, आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांचे ऐकणार, या प्रश्नावर सरकारची गोची झाल्याचे दिसले. मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे, असे राज सतत सांगत आहेत. भोंगे बंद करा म्हणून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा म्हणायला राज्यात फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही हेही वास्तव आहे. अंगावर किती गुन्हे घ्यायचे, हा कार्यकर्त्यांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. एकदा अटक झाली की कोठडी, जेल, वकील, कोर्टाच्या तारखा, जामीन आणि पंधरा-वीस वर्षे तरी पोलीस स्टेशन व कोर्ट-कचेरीत जातात. त्यामुळे कशाचीही पर्वा न करणारे आता फार थोडे आहेत. राज यांच्या धमकीनंतर अनेक मशिदींवरील भोंगे बंद झाले. अनेक मशिदींवर भोंग्यांशिवाय अजान झाले. अनेक मशिदींवरील भोंग्याचे आवाज कमी झाले आणि मशिदींवर भोंगे लावायला परवानगी मिळावी म्हणून पोलीस ठाण्यावरही शेकड्यांनी अर्ज आले.
राज ठाकरे किंवा नवनीत राणा, हे हनुमान चालिसा पठण करू असे सांगतात. महाराष्ट्रात घराघरांत ‘भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती’, हे मराठीतून स्तोत्र म्हणतात. उत्तर भारतातून आलेल्यांना हनुमान चालिसाविषयी प्रेम असते. राज व राणा यांनी महाराष्ट्रात भीमरूपी महारूद्रा ऐवजी चालिसाचा आग्रह का धरावा? कारण त्यांना चालिसामुळे देशभर टीआरपी मिळाला. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून सचिन वाझेपासून प्रदीप शर्मा मालिका चालूच आहे. चालिसे झाला, भोंगे झाले, आता पुढे काय? सोशल मीडियावर एक पोस्ट बोलकी होती – मेरी दादी माँ हमेशा कहती थी की, हनुमान चालिसा पढने पर भूत और पिशाचों को बहुत पिडा होती हैं, आज देख भी लिया…।