अनुराधा परब
कोणत्याही संस्कृतीचा विचार करताना ती संस्कृती कोणत्या भूभागाशी जोडलेली आहे, याचा विचार अभ्यासकांना, संशोधकांना प्रथम करावा लागतो. कारण संस्कृतीचा पायाच भूगर्भशास्त्र, भूगोल यांचा असतो. त्यानुसारच तिथली माणसे, पर्यावरण घडत जाते आणि त्यातूनच सर्वस्वी वेगळे असे अर्थशास्त्र उभे राहते. या अर्थशास्त्राच्या बळावरच नंतरच्या टप्प्यावर तिथली संस्कृती किंवा सामाजिक – धार्मिक – राजकीय – शैक्षणिक आदी संस्कृतीची सर्व अंगे फुलत जातात.
ही सर्व परिमाणे सिंधुदुर्गातील संस्कृतीला आपण लावतो त्यावेळेस असे लक्षात येते की, सिंधुदुर्ग हा गुजरातपासून सुरू होणाऱ्या आणि केरळपर्यंत विस्तारलेल्या कोकण या भौगोलिक भागाचा एक महत्त्वाचा तुकडा आहे. राजकीयदृष्ट्या पाहायचे, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याचा समावेश कराची ते कारवार असा विस्तृत पट असलेल्या ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’मध्ये होत होता. याचाच अर्थ सिंधुदुर्गातील संस्कृती एका अर्थाने गुजरात ते केरळ या कोकणाला जोडलेली आहे, तर तिची दुसरी नाळ ‘बॉम्बे प्रेसीडन्सी’शी जोडलेली आहे. याशिवाय या संस्कृतीला स्वतःचे असे तिसरे परिमाण आहे. राजापूर ते गोवा या मोठ्या भौगोलिक पट्ट्यातील प्रदेशाशी ते जोडलेले आहे. नेमका हाच भाग आता वेगळा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून राजकीय पटलावर आला आहे. संस्कृतीचे कोणतेही परिमाण घेतले तरी एक सामायिक बाब कुणाच्याही नजरेस सहज येते ती म्हणजे कोकणची किनारपट्टी. कोकणाची संपूर्ण संस्कृतीच या किनारपट्टीवर उभी राहिली, फोफावली आणि तिनेच या संस्कृतीस आकार दिला.
ऐतिहासिक कालखंडामध्ये कोकणाचा पहिला उल्लेख सापडतो, तो सम्राट अशोकाच्या काळात. कोकण किनारपट्टीवर त्याचे राज्य होते, याचा ढळढळीत पुरावा तत्कालीन पूर्वीचे ‘शूर्पारक’ अर्थात आजचे नालासोपारा येथील त्याच्या शिलालेखात सापडते. बौद्ध धर्मग्रंथांनुसार तेव्हा ‘अपरान्त’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किनारपट्टीच्या प्रदेशात बौद्ध धर्मप्रसारार्थ सम्राट अशोकाने धम्मरक्खित या भिक्खूस पाठविले. सम्राटाचा मुलगा महिंद आणि त्यांची मुलगी संघमित्रा या दोघांनी श्रीलंकेस जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यांच्या श्रीलंका दौऱ्याचा प्रारंभ शूर्पारक बंदरातून म्हणजे आजच्या नालासोपाऱ्यातून झाला. अशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती कर्नाटकापर्यंत असल्याचे पुरातत्त्वीय पुरावे सापडलेले आहेत. या भागात सिंधुदुर्गाचा समावेश पूर्णपणे होतो. नंतर आलेल्या सातवाहनांच्या काळात द. कोकणातील त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे फारसे सापडत नसले, तरीही उत्तर कोकणातील पुरावे मात्र सापडतात. किंबहुना, सातवाहनांच्याच काळात महाराष्ट्रात लयनस्थापत्य अर्थात लेणी मोठ्या प्रमाणावर उभी राहिली. त्यानंतर इ.स. चौथ्या, पाचव्या शतकात वाकाटक आणि कलचुरी साम्राज्य इथे होते. यातील वाकाटकांचे पुरावे सापडतात. कलचुरींच्या कालखंडात घारापुरीची लेणी खोदली गेली, असे काही पुराविदांचे म्हणणे आहे, तर त्यांच्या दुसऱ्या गटाला असे वाटते की, याच काळात कोकण मौर्यांची सत्ता कोकणात आली. ती बदामीच्या चालुक्यांनी उलथून टाकली. नंतर इथे कदंब, शिलाहार, राष्ट्रकूट, यादव आदींची सत्ता आली. ११व्या शतकात मुस्लीम आक्रमणाला भारताला सामोरे जावे लागले. त्यास कोकणदेखील अपवाद नव्हते. या सर्व राजसत्तांना कोकणाच्या किनारपट्टीत सर्वाधिक स्वारस्य होते. कारण ही किनारपट्टी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून व्यापारासाठी प्रसिद्ध होती. या मार्गाने आलेल्या व्यापारी मालातून त्या-त्या काळातील राजसत्तांना सर्वात मोठा महसूल मिळाला. हे सारे ब्रिटिश येईपर्यंत तसेच सुरू होते. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे स्वराज्यात येणाऱ्या शंभर होन महसुलापैकी ऐंशी होन हे एकट्या कोकण किनाऱ्यावरील व्यापारातून येतात, हे लक्षात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी राजगडावरून कोकणात रायगड येथे हलविली.
कोकण किनारपट्टीवर जेव्हा कोणतीही मोठी राजसत्ता कार्यरत नव्हती, तेव्हा इथे डहाणूपासून कारवारपर्यंत छोट्या-छोट्या राजसत्ता वेळोवेळी अल्पकाळासाठी का होईना; अस्तित्वात आल्या. यापैकी काहींची नाणी कोकण किनारपट्टीतील गावांतून झालेल्या उत्खननांमध्ये सापडली आहेत. चालुक्य राजा पुलकेशीन द्वितीय याने कोकण मौर्यांची राजधानी असलेल्या पुरीवर हल्ला चढविला आणि त्यांची सत्ता उलथवून टाकली. त्याचाच गौरवपर शिलालेख कर्नाटकातील ऐहोळे येथे मेगुती मंदिरात कोरलेला आहे. ही ‘पुरी’ म्हणजे सध्याचे ‘राजापूर’ तर नव्हे ना?, असाही तर्क मांडला जात आहे. एकुणात काय, तर गेली २३०० वर्षे कोकणची किनारपट्टी ही व्यापारासाठी प्रसिद्ध होती, याचे सुस्पष्ट पुरावे सापडतात.
याच व्यापाराच्या आदान-प्रदानाच्या समांतर विविध धर्म, त्यांची संस्कृतीदेखील कोकणात प्रवेशकर्ती झाली. कधी बौद्ध, कधी जैन, तर कधी मुस्लीम लोक व्यापाराच्या निमित्ताने इथे आले, राहिले आणि इथलेच झाले. त्यांनी इथल्या संस्कृतीला हातभार लावला आणि इथल्या संस्कृतीने त्यांना आपल्यात सामावून घेत त्यांनाही वाढू दिले. म्हणून इथे एक वेगळी व्यामिश्र संस्कृती हसत-खेळत नांदताना दिसते.