Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटिंग

वैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटिंग

लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; रिसॉर्टवर कारवाईची मागणी

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील खरिवली पौलबारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत वैतरणा नदीकिनारी ‘अंचावियो रिसॉर्ट’ मध्ये आलेल्या पर्यटकांना वैतरणा नदीपात्रात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. वाढदिवस, लग्न वाढदिवस इत्यादी कार्यक्रम करण्यासाठी तराफा (राफ्ट)ची सुविधा नदीपात्रात केली आहे. मात्र हे करताना रिसॉर्ट प्रशासनाकडून परवानगी न घेता हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, विनापरवाना हा व्यवसाय करणाऱ्या रिसॉर्टवर कारवाईची मागणी केली जात आहे. यासंदर्भात वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय आमच्याशी निगडित नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

वाडा तालुका हा निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. शिवाय वैतरणा नदीपात्रात तिळसे येथे तिळसेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. याशिवाय वाड्याच्या पश्चिमेला कोहोज किल्ला आहे. निंबवली येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. गुंजकाटी येथे भगवान परशुरामाचे मंदिर असून ही भूमी साधुसंताच्या वास्तव्याने पावन झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात असते.

खरिवली पौलबारे येथे वैतरणा नदीकिनारी अंचावियो रिसॉर्टमध्ये हौशी पर्यटक येतात. विशेषतः गुजराती,मारवाडी समाजाचे नागरिक येथे मोठ्या संख्येने येतात. येथे आलेल्या पर्टकांसाठी बोटिंची सुविधा उपलब्ध आहे. नदीपात्रात तराफा तयार केले असून, त्यामध्ये रात्रीच्या सुमारास वाढदिवसांसारखे कार्यक्रम साजरे केले जातात. चार-पाच तासांसाठी येथे हजारोंचे बिल आकारले जाते. नदीपात्रात बोटिंगची सफर केली जाते.

मात्र हे करताना लघुपाटबंधारे विभागाची परवानगी न घेता हा व्यवसाय खुलेआमपणे अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. दरम्यान, कोरोना काळात सर्वत्र निर्बंध असताना या रिसॉर्टमध्ये एका लग्नसमारंभावर धाड टाकत तहसीलदारांनी कारवाई केली होती. तसेच बोटिंगमध्ये
काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याचे

येथील नागरिक सांगतात. दरम्यान, नदीपात्रात विनापरवाना बोटिंग, तराफ्याचा वापर करणाऱ्या रिसॉर्ट व्यवस्थापनावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -