Saturday, June 21, 2025

अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खणन पूर्ण

अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खणन पूर्ण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत, अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचे खणन शुक्रवारी पूर्ण झाले.


पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या काही भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व भविष्यातील वाढीव पाणीपुरवठ्याचा विचार करून पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत हा एकूण सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असताना देखील या जलबोगद्याच्या कामात प्रशासनाने खंड पडू दिला नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाईल, याचा महानगरपालिका प्रशासनाला ठाम विश्वास आहे.


या जलबोगदा प्रकल्पाअंतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतीपथावर आहे.

Comments
Add Comment