गौसखान पठाण
सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी अंबा नदीच्या पाण्यात अचानक चिखल व गाळ आल्याने पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ झाले होते. चिखलामुळे अंबा नदीचे पाणी पूर्णपणे मातकट रंगाचे झाले होते. शिवाय असे गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांना आले. नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
याशिवाय अंबा दिला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल २० कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे.
परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहिरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाण्यात नगरपंचायतीद्वारे औषध टाकण्यात आले आहे. तसेच दोन-तीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. – सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती
उन्हेरे धरणाची जॅकवेल व तेथील दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा दरवाजा उघडल्याने धरणातील गाळ पाण्यामार्फत नदीला मिळाला आहे. दोन दिवसात पाणी स्वच्छ होईल.
– राकेश धाकदतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग