मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाचे संकट ओढावले आहे. राज्यातील जनतेने आपले थकीत वीज बिल लवकरात लवकर भरावे असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून करण्यात येत असतानाच, आता राज्यातील आमदार, खासदारांनीच करोडो रुपयांचे वीज बिल थकवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती ऊर्जा विभागाच्या नव्या यादीतून समोर येत आहे.
राज्यातील एकूण ३७२ राजकीय व्यक्तींकडे तब्बल १ कोटी २७ लाखांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याचे समजत आहे. यामध्ये राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांबरोबरच भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ७० हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. ऊर्जा विभागाने थकीत वीज बिलांबाबत जाहीर केलेल्या या नव्या यादीतून ही माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी २ लाख ६३ हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे. त्याचबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे १ लाख २५ हजारांची थकबाकी आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे १ लाख, शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांचे १ लाख ५० हजार, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे ७ लाख, भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचे ३ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे समजते.