मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्य बोर्डाचे अध्यक्ष यांनी शुक्रवारी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी सज्ज व्हावे असा संदेश यावेळी मिळत आहे. पेपर तपासणीचे काम जरी पूर्ण झाले प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास थोडा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
परीक्षा होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून आता पेपर तपासणीचे कामदेखील झाले आहे. त्यामुळे आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर मार्क्स मॉडरेट केले जातात. प्रत्येक उत्तरपत्रिकेला स्कॅन केलं जातं. बारकोड्स सुद्धा स्कॅन करून चेक केले जातात. प्रत्येक विभाग आपापला स्वतंत्र अहवाल तयार करतो. या अहवालात नमूद केलेल्या चुका आणि त्यात सुधारणा करण्यासाठी लागणारा कालावधी या आधारे आम्ही शिक्षण विभागाकडे निकालासंदर्भात प्रस्ताव पाठवतो. यानंतर महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर करतो.
पेपर तपासणी आणि पुढील प्रक्रियेबद्दल माहिती देताना महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्षांनी माहिती दिली की, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १५ ते २० जून दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल ५ ते १० जून दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. काही अडचण आल्यास या तारखांमध्ये बदलही होऊ शकतो. सध्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि विभागावर अहवाल पूर्ण झाला आहे.