मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरात नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पावसाळापूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून वेगाने सुरू आहेत. प्रत्येक मुंबईकर नागरिकाला आपल्या विभागात नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे कशी केली जात आहेत, ते आता सहजपणे पाहता येणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर याबाबतची सुविधा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली असून ६ मेपासून ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.
नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दर वर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो.
एकूणच जवळपास ८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ हा मुंबई बाहेर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो. अनेकदा नालेसफाईच्या कामावरून नागरिक असमाधानी असतात, तर विरोधकही टीका करतात. यामुळे पालिकेने एका विशिष्ट सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. त्या सॉफ्टवेअरची लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://swd.mcgm.gov.in/wms2022 या नावाने देण्यात आली आहे. ही लिंक वापरून प्रत्येक नागरिकाला आपल्या विभागामधील नाल्याची गाळ काढून स्वच्छता कशी केली जाते?, ते सहजपणे मोबाइलद्वारे देखील पाहता येणार आहे. ही सुविधा शुक्रवारपासून नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे.
या लिंकवर विभागातील विविध नाल्यांची तपशिलवार माहिती, प्रत्येक नाल्यामधून काढलेल्या व वाहून नेलेल्या गाळाचा तपशील, गाळ वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनाचा छायाचित्रांसह तपशील आणि नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू असतानाची छायाचित्रे/दृश्य चित्रफीत नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार व सुलभरीत्या दररोज पाहता येणार आहे.