डोंबिवली : कोकणचे नेते व भाजपचे आमदार नितेश राणे हे रविवारी दिवा येथे येत असून भारतीय जनता पक्षाच्या दिवा शहर मध्यवर्ती कार्यालयाचे व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे. भाजपचे ठाण्याचे नेते आमदार संजय केळकर व जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे.
दिव्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीकडे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी विशेष लक्ष दिले असून दिव्यात बेडेकर नगर हा बहुसंख्य कोकणी नागरिकांची वस्ती आहे आणि यातच आमदार नितेश राणे या भागात येणार असल्याने कोकणी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले. तसेच आमदार नितेश राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.