नवी दिल्ली : घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे नवी दिल्लीत आता सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विविध कर लावण्यात आल्याने प्रत्येक शहरामध्ये गॅस सिलेंडरचे दर वेगळे असतात. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर १,०२० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.
याआधी २२ मार्चला ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते. १ एप्रिलला व्यावसायिक कारणांसाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात त्यामध्ये १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक कारणासांठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एका सिलेंडरचे दर २,२५३ रुपयांवर पोहोचले आहेत. २२ मार्चला १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ९ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ६५५ रुपयांवर पोहोचले आहेत.