श्रीपाद फाटक
अपना बाजार ९ मे २०२२ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मुंबईतील नायगाव व दादर या परिसरात गिरणी कामगारांच्या सहकार्याने सहकार चळवळ सुरू झाली. दादासाहेब सरफरे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ९ मे १९४८ रोजी नायगाव कामगार ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेड या एका लहानशा विक्री दालनाची सुरुवात केली आणि धान्य, कडधान्य व रेशन या माध्यमातून ग्राहक पुरवठा करून जनसामान्यांचा सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांनी लावलेलं एक छोटंसं रोप हळूहळू बहरत गेलं. संस्थेने मग कापड विक्री, औषध विक्रीही सुरू केली.
१९६८ मध्ये संस्थेने नायगाव विभागात मॉल संस्कृतीला अनुसरून पहिले डिपार्टमेंट स्टोअर सुरू केले. छोट्याशा रोपट्याचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर होऊ लागले. कालांतराने नवनवीन शाखा सुरू करण्यात आल्या. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातही संस्थेने आपले पाय रोवले. बहुराज्य स्तरांवर गोवा व गुजरात या ठिकाणीही संस्थेची विक्री दालने सुरू करण्यात आली. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आपल्या संस्थेने पुढे दूध, मसाला, लोणची व डाळी उत्पादन क्षेत्रात पदार्पण केले व चांगले यश मिळविले. आज अपना बाजार या नावाने प्रसिद्ध असलेली मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित ही भारतातील एकमेव व बहुराज्य ग्राहक सहकारी संस्था आहे. अचूक वजन, उत्कृष्ट दर्जा, एमआरपीपेक्षा कमी विक्री दर ही संस्थेची वैशिष्ट्य आहेत. संस्थेस २००२ या वर्षी बहुराज्य ग्राहक सहकारी संस्थेचा दर्जा प्राप्त झाला. या आर्थिक वर्षात संस्थेची डिपार्टमेंट स्टोअर्स, सुपर मार्केट, औषधी दुकाने अशी एकूण २२ विक्री दालने कार्यरत आहेत. संस्थेत एकूण ४१७ कर्मचारी कार्यरत आहेत. वेळोवेळी संस्थेने भाजी-फळे, तांदूळ, गहू आणि इतर धान्य थेट शेतकऱ्यामार्फत खरेदी करून लोकांना कमी दरात पुरविले आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या राज्यांतून शासनाचे व कंपन्यांचे प्रतिनिधी संस्थेच्या वेगवेगळ्या विक्री दालनास भेट देतात. ग्राहकांना मोफत घरपोच सेवा प्रदान केली जाते. सभासदांकरिता अक्षय लाभ योजना सुरू आहे. प्रत्येक वर्षी सभासदांना १० टक्के रकमेचे गिफ्ट व्हाऊचर लाभांशाच्या स्वरूपात देण्यात येतात. सामाजिक बांधिलकी व ग्राहक कल्याणाकरिता संस्थेच्या नायगाव डिपार्टमेंट स्टोअर येथे दादासाहेब सरफरे आरोग्य केंद्र कार्यरत आहे.
या ठिकाणी रुग्णांना कमी दरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा मिळते. वेगवेगळ्या विक्री दालनात ग्राहक मेळावे आयोजित केले जातात. सेवक अधिकारी व संचालक मंडळाकरिताही वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. दर वर्षी दादासाहेब सरफरे व्याख्यानमालाही आयोजित करण्यात येते. सरकारने आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशात व्यवसाय करण्याची मुभा दिलेली आहे. बाजारपेठेत सध्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे व या स्पर्धेमध्ये अपना बाजार ठामपणे टिकून आहे. चांगली ग्राहकसेवा देण्याचा, त्यातून प्रगती करण्याचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद फाटक आणि उपाध्यक्ष अनिल गंगर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, संस्थेचे सर्व कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग अतोनात प्रयत्न करीत आहेत. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अपना बाजारला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
भारताचे तत्कालिन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ मे १९९७ रोजी अपना बाजारच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळा थाटात संपन्न झाला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी. सी. अलेक्झांडर, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक मधु दंडवते त्यावेळी समारंभास आवर्जून उपस्थित होते. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यावेळी म्हणाले होते की, ‘देशाला अभिमान वाटावा अशा संस्थेची मी नाते जोडले आहे’, तर राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर म्हणाले होते की, ‘सहकारी क्षेत्रात अपना बाजारने मानदंड निर्माण केले आहे.’ मुख्यमंत्री जोशी यांनीही ‘अपना ही एक संस्कृती आहे आणि ती जोपासायला हवी’, असं सांगितलं होतं.
संस्थेच्या स्थापनेपासून दादासाहेब सरफरे, एन. के. सावंत, ह. ना. पाटील, उपेन्द्र चमणकर, सुरेश तावडे, विष्णू आंग्रे, प्रभाकर माने आदींनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामकाज पाहिले. गोविंद गजमल, राम महाडिक, ज्ञानदेव घाडगे, बाबुराव गौड आदी नेत्यांची त्यांना साथ लाभली. गजानन खातू, पांडुरंग कांबळी, एस. टी. काजळे आदींनी आतापर्यंतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अपना बाजारने अनेक लहान-लहान ग्राहक सहकारी संस्थांना आपल्या संस्थेत विलीन करून घेतले आहे. महाराष्ट्रात सहकारी चळवळ नेहमी अग्रेसर राहिली आहे. अपना बाजारने या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व कायम करून आदर्श निर्माण केला आहे. अपना बाजारने सर्व विक्री दालनांचे नूतनीकरण करून सीसीटीव्ही व इतर आधुनिक सोयी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे. अमृतमहोत्सवी वर्षात संस्थेच्या ७५ वर्षांच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या पदाधिकारी-कर्मचाऱ्यांसह इतरांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात येणार आहे.