नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेलजवळील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला एक ट्रेकर ६० फूट खोल दरीत पडल्याची घटना बुधवारी ४ मे रोजी घडली. मात्र फक्त दैव बलवत्तर म्हणून हा ट्रेकर बालंबाल बचावला आहे.
पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, पोलीस हवालदार ओंबासे, बदलापूर रेस्क्यू टीमचे नागेश साखरे व इतर तीन सदस्य यांनी शर्थीचे प्रयत्न करून ट्रेकर विराज संजय मस्के (वय २०) रा. तुळाशेत पाडी, भांडुप याचे प्राण वाचवले आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण चंदेरी किल्ल्यावरून पनवेलच्या बाजूला खोल दरीत पडल्याची खबर मिळाली. या घटनेची माहिती निसर्ग मित्र संस्थेला देऊन त्यांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात आले. पोलीस हवालदार ओंबासे, रीटघरचे पोलीस पाटील दीपक पाटील, स्थानिक रहिवासी यांनी घटनास्थळी धाव घेत विराज मस्के यास दोरीच्या साह्याने दरीतून वर काढले.
अथक प्रयत्नांती गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन विराजला ॲम्बुलन्सने बदलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास पाठवण्यात आले.