शहापूर (वार्ताहर) : तानसा धरणातून मुंबई शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनी लगतच्या ग्रामपंचायतींना मुंबई महापालिकेने दत्तक घ्यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून असून याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक विचार केल्यास ग्रामीण भागातील या उत्पादनाचे साधन नसलेल्या ग्रामपंचायती सक्षम बनण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
मुंबई-ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिका मालकीची तानसा जलाशयातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याबरोबरच या माध्यमातून मध्य, अप्पर वैतरणा, मोडकसागर धरणाचे पाणीही वितरण होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील तानसा-अघई भागातून पाणीपुरवठा होणारी जलवाहिनी ही शहापूर, भिंवडी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतून गेलेली आहे. त्यामुळे उत्पादनात देशात सर्वात अग्रेसर असलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने या ग्रामपंचायतींचा विचार करावा, अशी अपेक्षा या वाहिनीलगतच्या ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना आहे.
तानसा जलवाहिनीलगत शहापूर तालुक्यातील अघई, भावसे, टहारपूर, वेहलोंडे, पिवळी-वांद्रे, तर भिंवडी तालुक्यातील केल्हे, मैंदा, जांभिवळी, पाच्छापूर, महाप, शिरोळे, खांबाळा, दाभाड, किरवली, लाप, खालिंग, चिंचवली, खांडपे आदी वाहिनीलगतच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायती येत आहेत. सदर ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती या शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असून गावातील घरपट्टी सोडल्यास दुसरे उत्पादनाचे साधन नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींना विकासाला चालना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी बहुतांशी ग्रामीण व आदिवासी भाग आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका शासन व प्रशासनाने अशा ग्रामपंचायतींना दत्तक घेऊन सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत किंवा जलवाहिन्या गेल्यानुसार ग्रामपंचायत अधिनियमित अधिकाराच्या रूपाने कराचा परतावा द्यावा, जेणेकरून ग्रामपंचायतींना विकासात्मकदृष्ट्या सक्षम बनण्यास चालना मिळेल, असा आशावाद ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने टाकलेल्या तानसा जलवाहिनीच्या माध्यमातून चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. या जलवाहिनी लगतच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना दत्तक घेऊन मुंबई महापालिकेने ग्रामपंचायतींचा विकास करणे अपेक्षित आहे. या संदर्भात महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. – जितेश विशे (उपसरपंच, वेहलोंडे )