लांजा (वार्ताहर) : उन्हाच्या वाढत्या तीव्र झळांनी लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये दर वर्षी पाणीटंचाईचा चटका बसणाऱ्या कोचरी भोजवाडी, चिंचुर्टी व कोंडगेमधील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. दरम्यान लांजा पंचायत समितीमार्फत या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दर वर्षी शासनामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात लाखो रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र पाणीटंचाई अद्यापही कमी झालेले नाही. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात वसलेल्या कोचरी गावातील भोजवाडी, चिंचुर्टी गावातील धनगर वाडी आणि बौद्धवाडी, तर कोंडगे धनगरवाडी या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धावडे वाडी, भोजवाडी येथील विहिरी आटल्याने आणि पाण्याचे मुख्य स्त्रोत देखील आटल्याने येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. मे महिन्यात ही दाहकता अधिक वाढली आहे.
कोचरी व कोंडगे गावांत काही दिवसांपूर्वी टँकर सुरू करण्यात आला आहे, तर चिंचुर्टी धनगरवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचे पाण्यापासून होणारे हाल लक्षात घेऊन लांजा पंचायत समितीमार्फत या गावात बुधवारी ४ मे पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.