Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक

मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक

मुंबई : मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे. यात आता संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटून जात असताना त्यांची कार दामटवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुरू असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तसंच काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यातही घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ४ मे रोजी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात पोहोचले होते. यावेळी माध्यमांचा गराडा आणि झालेल्या गर्दीतून वाट काढत संदीप देशपांडे व संतोष धुरी आपल्या खासगी कारमध्ये बसून पोलिसांच्या हातून निसटले होते. या झटापटीत एक महिला पोलीस खाली पडून जखमी झाली होती. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कायम पोलिसांना सहकार्य केलं आहे. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो. पण खोट्या केसेस करणार असाल, तर ते कदापि सहन करणार नाही, अशा शब्दांत देशपांडेंनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडली आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दाखवली.

Comments
Add Comment