मुरुड (वार्ताहर) : साळाव-मुरुड रस्त्यावरील सुकलेली झुकलेली झाडे अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत. मुरुडकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देतील का? असा सवाल नागरिक व प्रवासी वर्गाकडून होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून साळाव-मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या झाडाझुडूपांचा विळखा तसेच काही ठिकाणी सुकलेली झुकलेली झाडे वाहतुकीला अडथळा ठरत असून त्या पावसाळ्यापूर्वी हटविणे गरजेची आहेत. याकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षाबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे.
मुरुड-जंजिरा किल्ला, काशिद बीच पर्यटनात या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते, तर शनिवार-रविवार रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा असून वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागते आहे. लवकरात लवकर ही झाडे हटविण्यात यावी. तसेच पावसाळ्यापूर्वी अपूर्ण असलेली रस्त्याच्या डांबरीकरणाची कामेदेखील पूर्ण होतील काय? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.