मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातील परळी कोर्टानेही अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मराठी पाट्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झाले असल्याचे समजते. या प्रकरणात आता गृहखाते अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गृहखाते कारवाई करेल अशी माहिती मिळत आहे.
२००८ साली मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीने परळी येथे आंदोलन करण्यात आले होते. परळी येथे त्यावेळी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसांपूर्वी सांगलीतील शिराळा येथे राज ठाकरेंविरोधात एक आजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर आता पाठोपाठ परळी येथेही असेच वॉरंट जारी करण्यात आले आहे. याविषयी एक पत्र मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसही अॅक्शन मोडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार आणि मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असल्याचे चित्र आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटणार का अशी चर्चा सुरु आहे.