Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतील सिद्धार्थ नगरमधील ३,५०० घरांची वीज तोडली

मुंबईतील सिद्धार्थ नगरमधील ३,५०० घरांची वीज तोडली

१०२ कोटींच्या थकबाकीमुळे कारवाई केल्याचं अदानी इलेक्ट्रिसिटीचं म्हणणं

मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील थकबाकीमुळे ३५०० घरांची वीज अदानी इलेक्ट्रिसिटीकडून तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कॉलनीतील ३ हजार ५०० रहिवाशांची वीज बिलाची थकबाकी असल्याची माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने दिली आहे. ऐन उन्हाळ्यात ही कारवाई केल्याने सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, १६ वर्षापासून वीज बिलांची थकबाकी आहे. याबाबत आता अदानी इलेक्ट्रिसिटीने ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

२००५ मध्ये एका विकासकाने पुनर्विकासासाठी रहिवाशांची संमती मिळवण्यासाठी, आपण तुमची वीज बिले भरू असे आश्वासन दिले. पुढे दोन विकासकातील साठमारी आणि रहिवाशांमधील अंतर्गत राजकारण यामुळे पुनर्विकास खोळंबला. मात्र तेव्हापासून रहिवाशांनी बिले भरणे बंद केले. मात्र सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी थकबाकी भरली नसतानाही माणुसकी म्हणून इतकी वर्षे वीज पुरवठा सुरू ठेवला होता, असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

एखाद्याला त्याच्या जागेच्या परिसरात वीज जोडणी दिली जाते आणि त्याबाबतची देय रक्कम भरण्याची जबाबदारी ही त्या परिसराच्या मालकाची असते. २००५ मध्ये पुनर्विकासकांनी रहिवाशांची वीज देयके भरण्याचे आश्वासन दिले होते, असा सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांचा दावा आहे. मात्र परिसरातील पुनर्विकासाबाबत मात्र आजतागायत कोणतीही प्रगती झालेली नाही आणि दुर्दैवाने विजेची थकबाकी रु. १०२ कोटींहून अधिकपर्यंत पोहोचली आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनी प्रत्येक वेळी प्रयत्न करते. मात्र आंदोलने आणि निदर्शनामुळे या प्रयत्नांना खीळ बसली आहे. रिलायन्स इन्फ्राकडून व्यवसाय घेतल्यापासून अदानी इलेक्ट्रिसिटीने वीज चोरी आणि थकबाकी यावर कठोर भूमिका घेतली आहे.

“आज अचानक सकाळी ८ वाजता कोणतीही पूर्व सूचना न देता अदानी इलेक्ट्रिसिटीने सिद्धार्थ कॉलनीतील वीज कापली. सिद्धार्थ कॉलनीतील जवळपास ३५०० कुटुंबीयांची वीज तोडली आहे. याला सर्वस्वी विकासक जबाबदार आहेत. सिद्धार्थ कॉलनीचा विकास व्हावा यासाठी २००५ साली एसआरएने पुढाकार घेतला. त्यावेळी तीन ते चार वर्षांची वीजबिल थकबाकी होती. यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन एसआरएने दिले होते. परंतु तोडगा अजून निघाला नाही. यामध्ये वीजबिल वाढतच गेले. अदानी समूहाकडून अनेक वेळा अचानक वीज कापली जात आहे. याचा फटका नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांनाही बसतो, कर्मचारी मीटर कापणी करायला आल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होतो. आम्ही अनेक वेळा वीजबिल भरायला तयार होतो पण रक्कम जास्त होती. यावेळी विकासकांनी दिलेल्या आश्वासनामुळे कॉलनीतील सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

एरवी ग्राहक वीज चोरी करतो आणि थकबाकीसाठीचे पैसे भरत नाही, अशी भूमिका दिसते. वीज कायद्यांतर्गत ग्राहक हिताचे संरक्षण करण्यासाठी वीजचोरी आणि थकबाकी यांच्याविरुद्ध कारवाई करणे हे प्रत्येक वीज वितरण कंपनीला बंधनकारक आहे. काही स्वार्थी गट हे तेथील रहिवाशांची दिशाभूल करत असून सर्व भागधारकांच्या हितासाठी समस्येचे निराकरण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना हाणून पाडत आहेत असे दिसून येते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी थकबाकी भरली नसतानाही ते वीज पुरवठ्यासाठी पात्र आहेत असे मानत असणे हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मानवतावादी आधारावर आम्ही, या रहिवाशांच्या पैसे भरण्याच्या आश्वासनावर वीज पुरवठा पूर्ववत केला होता.”

“हे थकबाकीदार ग्राहक केवळ थकीत रक्कमच भरत नाही तर, थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा देयक न भरणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी कायदेशीररित्या तोडण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या कंपनीच्या कर्मचारी आणि भागीदारांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करतात. आमच्या कर्मचार्‍यांना प्रतिकाराबरोबरच, गैरवर्तन आणि धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ग्राहकांनी खंडित वीज पूर्ववत करून वीजचोरी सुरू केली आहे. आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी आणि प्रसंगी नियमित वीज भरणा-या ग्राहकांच्या हितासाठी ही कारवाई करण्यास तसेच सिद्धार्थ कॉलनीतील थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास आम्ही कायम बाध्य आहोत,” असे अदानी इलेक्ट्रिसिटीने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -