
३ हजार किमी पदयात्रा केल्यानंतर निर्णय घेणार
मुंबई : २ ऑक्टोबरपासून पश्चिम चंपारण्यापासून ३ हजार किमीची पदयात्रा केली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून अनेक गोष्टी समजून घेतल्या जातील आणि त्यानंतरच आपण स्वत:चा पक्ष स्थापन करायचा निर्णय घेणार असल्याचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सांगितले. भविष्यात जर कोणता पक्ष बनलाच तर तो सर्वांचाच असेल. तसेच आपण बिहारच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर यांनी बिहारची राजधानी पटना येथे पत्रकार परिषद घेतली. पुढील ३ ते ४ महिन्यांत १८ हजार नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी चर्चा करून अनेक गोष्टी समजून घेतल्या जातील. जे सहमत असतील तर त्यांना सोबत घेतले जाईल. त्यांनी सांगितले तर पक्ष स्थापन केला जाईल; पण तो फक्त माझा नाही तर सर्वांचाच पक्ष असेल.
बिहारच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेतल्या जाणार आहेत. तसेच भविष्यातील त्यांच्या अपेक्षांबाबतही चर्चा केली जाणार आहे. "जे माझ्याकडे आहे तर सर्व बिहारच्या विकासासाठी समर्पित केले जाणार आहे. कोणालाही मध्येच सोडण्याची इच्छा नाही", असे सांगत प्रशांत किशोर यांनी बिहारच्या नागरिकांना आश्वस्त केले.
आधीच्या सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, "लालू आणि नीतिश यांच्या ३० वर्षांच्या सत्तेनंतरही बिहार हे देशातील सर्वांत मागास राज्य आहे. विकासाच्या अनेक मानकांनुसार बिहार देशात अतिशय खालच्या पायरीवर आहे. येत्या काळात बिहारला वरचे स्थान प्राप्त करायचे असेल तर नवी विचारसरणी आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे".