संतोष वायंगणकर
कोकण म्हटलं की नारळ, पोफळीच्या बागायती, निळा समुद्र, पांढऱ्या वाळूची पायघडी अंथरल्याचा भास व्हावा अशी वाळू, आंब्याच्या बागांची आमराई, काजूच्या बागायती, घरासभोवतीच कोकमची उंच झाडं, दोन-चार चिंच, आवळ्याची झाडं आणि कुणालाही भुरळ पाडणारं सृष्टीसौंदर्य कोकणात पाहायला मिळतं. आजही अनेक गावांतच गावपण तितकच टिकून आहे. पूर्वीची गर्दझाडी अलीकडे फार कुठे दिसत नाही. उंच डोंगर पूर्वी गर्द झाडीत हरवलेले असायचे. अलीकडे ते सहज दिसतात. यावरून कोकणात जंगलतोड किती मोठ्या प्रमाणात होते हे समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राचा वनविभाग वृक्षतोडीला बंदी असल्याचे सांगतात; परंतु कोकणात मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे, त्यावर कोणी नियंत्रण आणत नाही. एवढंच कशाला शासनाने संरक्षित केलेल्या जंगलांमध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची एक फार गंमत असते. याच संरक्षित असलेल्या जंगलातून अगदी ट्रकभरून तोडलेली लाकडं विनासायास जायला देतील; परंतु कोणी गरीब शेतकरी एखादी फांदी तोडताना सापडला, तर त्याच्यावर केस दाखल करतील, जी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने होत असते. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्यानेच वन्यप्राणी वस्तीत फिरताना दिसू लागले आहेत. केवळ वाघच किंवा गवारेडेच गावातील शेतीत दिसत नाहीत, तर माकडं वस्तीत घरांवर दिसू लागली आहेत. याकडे गावांतील वानरे नारळ, पोफळीच्या बागायतींचं मोठं नुकसान करतात. या सगळ्या मागचे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड.
जंगलांमध्ये अनेक प्रकारची आंबा, फणस, कोकम, करवंद यांची झाडं असायची. यामुळे माकडं जंगलांमध्येच राहायची; परंतु गेल्या काही वर्षांत जंगलांमध्ये खायला काही उरलेले नसल्याने ही माकडं रस्त्यांवर दिसू लागली. पूर्वी कोकणात भातशेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलातील झाडांच्या फांद्या शेतात टाकून जाळायचे. जमीन भाजण्याचा प्रकार पूर्वी कोकणात होता. आजही भातशेतीसाठी आहे; परंतु झाडोरा जाळण्याचे प्रकार फारच कमी झाले आहेत. कोकणातील भातशेतीचं प्रमाण कमी होऊन बागायती उभ्या करण्यात आल्या. मात्र या उभ्या झालेल्या बागायतींमध्ये वन्यप्राण्यांचा वावर अधिक वाढला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसमोर ही फार मोठी गंभीर समस्या आहे. कष्टाने उभ्या केलेल्या बागायतींचं नुकसान होताना शेतकरी पाहतो तेव्हा तो फार अस्वस्थ असतो. त्याला निमूटपणाने होणारे नुकसान पाहावे लागते. हतबलतेपलीकडे हाती काही लागत नाही. कोकणातही काँक्रिटीकरण वाढले आहे. फ्लॅट सिस्टीम शहरांपुरती मर्यादित नाही, तर ग्रामीण भागातही या फ्लॅट सिस्टीमच्या इमारती उभ्या होऊ लागल्या आहेत. ४० ते ६० लाखांचा व्यवहार अनेकांना परवडतो आहे. त्यामुळे इमारती उभ्या राहत आहेत. अनेक गावांतून होणाऱ्या जंगलतोडीचे परिणाम सर्वत्र दिसतच आहेत.
पूर्वी जंगलमय दिसणारे भाग आज उजाड दिसत आहेत. ही जंगलतोड रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. उलट जे जंगलतोड करतात त्यांच्याशी यांची मिलीभगत असते. या जंगलतोडीचे परिणाम जरी आजच्या घडीला समोर आले नसतील तरीही त्याचे दूरगामी फार मोठे परिणाम आहेत. त्याचा विचार खरं तर आपण सर्वांनीच करण्याची आवश्यकता आहे. फार पूर्वी घर बांधताना लाकडाचा वापर व्हायचा. जुनाट वृक्ष घरांच्या बांधकामात वापरले जायचे; परंतु अलीकडे मात्र विशेषत: छप्पर हे स्लॅब टाकून किंवा स्टीलने बांधले जाते, हा मोठा बदल झालेला आहे. कशामुळे असो; परंतु घरबांधणीत लाकूड वापर कमी होऊ लागला हे चांगलंच झालं आहे. कोकणचं सौंदर्य हे इथल्या डोंगरदऱ्यात सामावलेलं आहे. हिरवागार कोकण ही आपल्या कोकणची ओळख आहे. एकिकडे कोकणात पर्यटन वाढत असताना कोकणची असलेली ही ओळख पुसटली जाता कामा नये, याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. कोकण उजाड होऊन चालणार नाही. ते कोकणात जपलं पाहिजे.