वाडा (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका म्हणजे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. याच वाडा तालुक्यातील सांगे गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी गौतम अनिल पाटील यांनी आपल्या शेतावर वेगवेगळे प्रयोग करत अनेक पिके घेतली. याचबरोबर वडील कृषिभूषण अनिल पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड सुरू केली.
फळबाग लागवड करताना त्यानी केळी, चिकू, पपई, केसर आंबा अशा फळ रोपांची लागवड केली. एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी कलिंगड लागवडीमध्ये बाहेरून पिवळी कलिंगड लागवड केली. त्यानंतर आतून पिवळी लागवड केली. गेल्या ५ वर्षांपासून कलिंगडानंतर आपल्याकडे चांगले येणारे पिक म्हणून सूर्य खरबूज लागवड केली व तो फार यशस्वी प्रयोग होऊन विक्रमी उत्पादन घेतले.
खरबूज, कलिंगड पीक खरेदी करताना एका महिला गृहिणीला सूर्य फळ/ musk melon ची मागणी केली असताना ते नदी किनारी होणारे पीक आपल्या जिल्ह्यात कोणी लावले असल्याचे दिसले नाही. हेच आव्हान समजून गौतम अनील पाटील यांनी सदर पिक लागवड केली व खूप छान पिक आले. सदर पीक कोकणात उन्हाळ्यात खूप छान होते. विशेष म्हणजे बदलत्या हवामानात व रणरणत्या उन्हात हे पीक चांगले तग धरून आहे.
प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकरात सूर्य खरबूजाची लागवड केली असून हे पीक ६० ते ७० दिवसांत तयार होते. या वर्षी फक्त अर्धा एकरावर त्याची लागवड केली असून सुमारे ५ ते ६ टन उत्पन्न मिळू शकेल, असे गौतम यांनी सांगितले. एक फळ साधारणपणे ८०० ग्राम ते दीड किलो वजनापर्यत भरते. नोनोयू या कंपनीचे हे वाण आहे. या फळाला बिग बास्केटमध्ये मागणी आहे.
शेतीत सतत सुधारणा व नवीन तंत्रज्ञान वापरून शेती सोपी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पिकांच्या सततच्या बदलत्या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक असते. ती बाब आम्ही करत असतो. – गौतम अनिल पाटील प्रयोगशील शेतकरी, नाणे.
सूर्य खरबूजचे गुणधर्म
व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात मिळते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. वजन कमी करण्यास उपयुक्त असून गोडपणा कमी आहे, त्यामुळे शुगरवालेसुद्धा ते खाऊ शकतात.