मुंबई : जागतिक व्यंगचित्र दिवसाच्या शुभेच्छा देत खासदार संजय राऊत यांनी मनसेला टोमणा दिला. ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांसारखी व्यंगचित्रकलेची क्षमता होती, असे आम्हाला वाटायचे, त्यांनी ते सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केले, असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला. यावर आता भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भोंगा आहे. या भोंग्यात हिम्मत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन एफिडेविट फाईल करावे, असा इशारा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिला आहे. पहाटे पाच वाजता वाजणारे भोंगे उतरवले हे या भोंग्याला कळत नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
तुम्ही पूर्ण हिरवे झाले आहात, त्यामुळे भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण आता आम्ही करणार आहोत, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. फक्त मशिदीवरील भोंगे उतरवायचे काम नाही. तुम्ही तर गणेशोत्सवामध्ये हे भोंगे उतरवले होते. भाजपाने खूप मोठी जबाबदारी मला दिली आहे. मला महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. जनतेने हे काम मला दिले आहे आणि ते मी करत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका करत ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा सात कोटींचा ट्रांजेक्शन समोर आले आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या १५ कंपन्यांसोबत ट्रांजेक्शन केले आहे. त्यामुळे आता हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्यात समोर येतील, असेही त्यांनी सांगितले.