अरुण बेतकेकर
राममंदिर विषयावर अलीकडे पुन्हा वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. हेतू, त्यातून श्रेय लाटणे यात शिवसेना नाहक वाटमारी करीत आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने म्हणत आहे. बाळासाहेब अशा संवेदनशील कामात मला नेहमीच गुंतवत असत. बाबरीच्या विषयातही त्यांच्याच आदेशाने मी एक जबाबदारी पार पडली होती. मध्ययुगीन काळात बाबराने १५२८ मध्ये रामजन्मभूमीस्थित मंदिर पाडून मशीद बांधली होती. रामजन्मभूमी व बाबरी मशीद हा वाद स्वातंत्र्यपूर्व अंदाजे ५०० वर्षे व स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे अबाधितरीत्या सुरूच आहे. यातील अंतिम टप्प्यातील चार महत्त्वाचे मुद्दे…
१) २९ सप्टेंबर १९९० रोजी या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याचा हेतू. लालकृष्ण अडवाणी यांनी संपूर्ण देशभर रथयात्रेद्वारे जनजागृती अभियान हाती घेतले. यास राज्याराज्यांतून प्रचंड प्रतिसाद मिळत गेला व तो वेगवेगळ्या कारणास्तव गाजलाही. या कालावधीत शिवसेनेचा या अभियानात कोणताही काडीमात्र सहभाग दृष्टिपथात नव्हता. शिवसेनेद्वारे अधिकृतरीत्या यात सहभागी होण्याचे आदेश दिले गेल्याचे दाखले नाहीत. कदाचित जे कोणी शिवसैनिक यात सहभागी झाले असावेत ते रामभक्त म्हणून स्वयंस्फूर्तीने.
२) ३० ऑक्टोबर १९९०. रथयात्राद्वारे प्रेरित लाखो रामभक्त हिंदू, अयोध्येच्या दिशेने चालून गेले. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीमधार्जिणे समाजवादी पक्षाचे सरकार होते आणि मुख्यमंत्री होते मुलायमसिंह यादव. त्यांच्याच आदेशाने झालेल्या गोळीबारात प्रथमच ५ रामभक्तांचा मृत्यू झाला. जनक्षोभ माजला. त्यात निर्दयीपणे घडलेल्या गोळीबारात २००० च्या वर कारसेवक मृत्युमुखी पडले. अयोध्येच्या रस्त्यावर देहांचे खच पडले. शरयूचे पाणी रक्ताने लाल झाले. पोलीस बळाने आंदोलन चिरडले गेले.
यापासून शिवसेना संपूर्णतः नामानिराळी राहिली होती. येथपर्यंत शिवसेनेचा कोणीही एकजण अटक वा मृत्युमुखी पडल्याचे ऐकिवात नाही आणि शिवसेनेने तसा दावाही कधी केला नाही. तद्नंतर चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. एक रणनीती म्हणून कोणीही बाबरी मशीद विध्वंसाची जबाबदारी घेण्यास पुढे येत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली, असा दावा कधीही केला नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात ते इतकेच म्हणाले होते, “शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल, तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे.” एक गंमतीदार घटना, रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेच्या प्रत्यक्ष सहभागापेक्षा वल्गना अधिक सुरू झाल्या. दिल्लीहून शिवसेना खासदारांचा गट आपापल्या मतदारसंघातील असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येकडे प्रस्थान करणार, अशा बातम्या येऊ लागल्या. बाळासाहेबांनी मला बोलावून घेतले. या खासदारांच्या हालचालींवर नजर ठेवून माहिती आणण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मी अन्य तीन पदाधिकाऱ्यांसह दिल्लीत दाखल झालो. मराठवाड्यातील एका खासदाराच्या निवासस्थानी पोहोचलो. पण ते राखीव दालनात बैठकीत व्यस्त होते. त्यांच्याबरोबर अन्य पाच-सहा खासदार उपस्थित होते. दरवाजा उघडा होता. चर्चेचा विषय होता अयोध्येकडे प्रस्थान. काही पूर्वनियोजित कार्यक्रमाविषयी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न चालला होता. फोन लागला, संभाषण सुरू झाले. पलीकडे होते मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे कार्यालय. त्यांच्या सचिवांशी पूर्वनियोजित कटानुसार बोलणी सुरू झाली. “आम्ही खासदार ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करू. निश्चित झालेल्या ठिकाणी आमची अटक व्हावी व तेथून ठरलेल्या सरकारी गेस्ट हाऊसवर आमची राहण्या-खाण्या-पिण्याची पुढील तीन-चार दिवसांसाठी सोय करण्यात यावी.” येथे मुख्यमंत्र्यांशी आधीच बोलणी झाल्याचा उल्लेखही केला गेला. तीन गाड्यांतून यांची सवारी सुरू झाली होती. सोबत कोणीही शिवसैनिक नव्हते. बातम्यांतून अटक व ठरल्यानुसार झाल्याचे कळले. तातडीने ही खबर मी बाळासाहेबांपर्यंत पोहोचवली. अशा प्रकारे पूर्वनियोजित नाटकाचा अंत झाला.
संजय राऊत हा नितांत ढोंगी, खोटारडा अन् बोलघेवडा, या दरम्यान लोकप्रभा साप्ताहिकात होता. एप्रिल १९९२मध्ये याने प्रत्यक्ष अयोध्येला भेट देत “रामाची राजकीय फरफट” हा लेख लिहिला. या लेखात श्रीराम, हनुमानसह देवी-देवतांविषयी अश्लाघ्य भाषेत हेटाळणी केली गेली आहे. राममंदिरासाठी पुढाकार घेणाऱ्या व कथित पुढाकार घेणाऱ्या, यात बाळासाहेब ठाकरेसुद्धा आले. यांच्यावर अर्वाच्च भाषेतून लाखोल्या वाहिल्या. लेख वाचणाऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्या वाचून राहणार नाही, इतका हा श्रीरामाचा अनादर करणारा लेख. हेच राऊत जून १९९२ साली सामन्यात रुजू झाले, दोन महिन्यांत शिवसैनिक झाले, रामभक्तही झाले. त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी उद्ध्वस्त झाली. त्याचेही श्रेय घेण्यास हे आघाडीवर आहेत. खोटे बोला पण रेटून बोला, या शर्यतीत या विदूषकाने आघाडी घेतली आहे. आश्चर्य म्हणजे या वादात दुरान्वयेही संबंध नसताना पूर्वग्रहाने मा. मु. उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
३) ६ डिसेंबर १९९२, निश्चित ध्येयाने प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली तिच्याशी संलग्न असलेले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच देशभरातून पोहोचलेले हिंदू रामभक्त यांनी हल्लाबोल करत बाबरी मशीद उद्ध्वस्त केली.
अटक झालेल्या हजारो कारसेवकांमध्ये एकही शिवसैनिक शोधून सापडत नाही.
४) शनिवार, ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ चालत आलेल्या या वादावर निर्णय देताना रामजन्मभूमीची बाजू उचलून धरत राममंदिराचा मार्ग प्रशस्त केला. आज मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे आकर्षक भव्यदिव्य मंदिर निश्चित असलेल्या गर्भगृहस्थानी लोक देणगीतून आणि कारसेवकांच्या श्रमदानाद्वारे बांधले जात आहे. याचे संपूर्ण श्रेय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबाकडे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वास मूठमाती दिली. एवढेच नव्हे तर परंपरागत शत्रू असलेल्या मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मश्गुल झाले. तरीही श्रीराम यांच्या स्वप्नात येत असल्याचे जाणवते. असे नसते तर राजकीय लाभापोटी आमचे हिंदुत्व, आमचे राम, आमचे राममंदिर अशी जपमाळ ओढावी लागली नसती. राममंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी, अयोध्येस सहकुटुंब भेटी तेही इतर जातात म्हणून. याच्यापलीकडे राममंदिर या विषयात शिवसेनेचा दुरान्वयेही संबंध नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. राममंदिर उभारणीत संघाचे योगदान वादातीत असूनही त्यांनाच, त्यावेळी आपण कोठे होता हा प्रश्न शिवसेना करत आहे. ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी नव्हे तर काय ?