वाडा (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजनेचे शाळा स्तरावरील मूल्यमापन ऐन उन्हाळी सुट्टीत ठेवल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे या स्पर्धेचा बोजवारा उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार ही केंद्र सरकारची संपूर्ण देशातील शाळांसाठी सुरू असलेली योजना आहे. सन २०२१-२२ च्या शालास्तरिय सर्वेक्षणावर आधारित २०२२-२३च्या पुरस्कार योजनेसाठी पालघर जिल्ह्यातील ५६६ शाळांनी आपली नोंदणी केली असून त्यांनी केलेल्या स्वयंमूल्यमापन अहवालाआधारे जिल्ह्यातील ५५९ शाळा स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
या शाळांचे बाह्य मूल्यमापन दि. १ ते १५ मे या कालावधीत होणार आहे. या मूल्यमापनासाठी जि. प. शिक्षण विभागाने सुमारे ४५० केंद्रप्रमुख, शिक्षक, साधन व्यक्ती यांना परीक्षक म्हणून नेमून त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे.
विशेष म्हणजे दि. २ मे २०२२ पासून जिल्ह्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून अनेक शिक्षक, विद्यार्थी आपल्या मूळगावी किंवा पर्यटनासाठी बाहेर गावी गेलेले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळी सुट्टीत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत स्वच्छ विद्यालय योजनेचे परीक्षण केल्यास ते कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात असून हे परीक्षण पुढे ढकलून जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात यावे, अशी मागणी पालघर जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष मनेश पाटील यांनी केली आहे