मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणाची माहिती आणि जनजागृतीसाठी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे पर्यावरणाचे धडे दिले जाणार आहेत. यासोबत अग्निसुरक्षेची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगणक आधारित शिक्षण दिले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच ब्रिटीश कौन्सिल तसेच बॉम्बे स्टॉक एक्सेंज आदींच्या माध्यमातून इंग्रजी भाषेसह आर्थिक व्यवहाराचे धडे देखील दिले जात आहेत.
यासोबतच आता विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक कामांची ओढ निर्माण व्हावी यासाठी उद्यानातील कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या विविध उद्याने आणि नर्सरीचा उपयोग केला जाणार असून विविध रोपांचे प्रकार, त्यांचे महत्त्व, बिया – रोपे लावण्याची पद्धत, त्यांची घ्यावयची काळजी या सगळ्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार असल्याचे उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
विशेष म्हणजे अग्नी सुरक्षेविषयीची माहिती देखील दिली जाणार आहे. सध्या मुंबईत आग लागण्याचे सत्र वाढले आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी किंवा आग रोखता येण्याचे उपाय, अग्निसुरक्षा नियम हे सगळे शिकवले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जवळच्या अग्निशमन दल कार्यालयात नेऊन त्यांच्या कामकाज तसेच तंत्रज्ञान आणि यंत्रांची माहिती दिली जाणार आहे. याकरीता विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक देखील तयार करण्यात येणार आहे.