सीमा दाते
मुंबई : सध्या मे महिन्यात मुंबईत सर्वत्र ताम्हण फुले बहरताना दिसत आहे, तर मुंबई पालिकेच्या मुख्यालयासह मुंबई ताम्हणाने बहरलेली दिसत आहे. ताम्हण फूल हे राज्य फूल असल्याने मुंबई पालिकेकडून त्याची रस्ते, उद्यानासह सर्वत्र लागवड करण्यात आली आहे.
मुंबईत एकूण ६,५६८ ताम्हण वृक्ष आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. दरम्यान मे महिन्याला सुरुवात झाली असून मुंबईभर जांभळ्या रंगाचे ताम्हण बहरले आहेत, तर दर वर्षी न चुकता महाराष्ट्र दिनाच्या आसपास बहरणारा हा ताम्हण वृक्ष असून ताम्हण फुलाला महाराष्ट्राच्या राज्य फुलाचा मान देखील मिळाला आहे.
हे फूल अगदी नाजूक क्रेप पेपरपासून बनवलेली फुले असल्याचा भास होतो. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. त्यामुळे हे फूल ‘क्वीन ऑफ क्रेप मर्टल’ म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदीत त्याला जारुल, तर लॅटिनमध्ये लँगस्ट्रोमिया स्पेसीओसा असे नाव आहे.
महाराष्ट्राचे राज्य फूल म्हणून ओळख असलेला ताम्हण वृक्ष महाराष्ट्रदिनापासून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दारात बहरला आहे. राज्य फूल असल्याने मुंबई महापालिकेकडून त्याची रस्ते, उद्यानासह सर्वत्र लागवड केली असून मुंबईत एकूण ६,५६८ ताम्हण वृक्ष आहेत, अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली.