मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी आयसीसी क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार भारतीय संघ टी-२० मध्ये दुसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
परंतु कसोटीत २०११ ते २०१६ अशी सलग ५ वर्षे अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारत दुसऱ्या स्थानावर घसरला असून, ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर वनडेमध्ये न्यूझीलंडने पहिल्या स्थानी शिक्कामोर्तब केले आहे.
टी-२० क्रमवारीत टीम इंडियाने झेप घेतली आहे. भारतीय संघाने २७० गुणांसह दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानी पोहचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचे २६५ गुण आहेत. पाकिस्तान तिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात २५१ गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावा लागलेला न्यूझीलंडचा संघ २५० गुणांसह सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात शानदार कामगिरी
रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाने तीन टी-२० मालिका जिंकल्या, तो कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाची टी-२० मधील कामगिरी शानदार राहिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघ पहिल्याच फेरीत टी-२० विश्वचषकातून बाद झाला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय दौऱ्यावर आली व त्यांनी न्यूझीलंडला ३-० त्यानंतर वेस्ट इंडिजचा ३-० आणि नंतर श्रीलंकेचा ३-० असा पराभव करत टी-२० मालिका जिंकली होती.
…तर कसोटीत टीमची दुसऱ्या स्थानी घसरण
विराटच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठणाऱ्या भारताला मोठा झटका बसला असून कसोटी क्रमवारीत गेल्या ५ वर्षांपासून अव्वल असलेल्या टीम इंडियाची या वर्षी दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अव्वल स्थानी पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गुणांची आघाडी घेतली आहे. भारताचे सध्या ११९ गुण असून अॅशेसमध्ये इंग्लंडचा ४-० असा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आता १२८ गुण झाले आहेत.