बोईसर (वार्ताहर) : पालघर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्यालय इमारतीत अनेक कार्यालये सुरू असली तरी तळमजल्यावर असलेले मध्यवर्ती आवक-जावक कक्ष बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हा कक्ष इतरत्र नेल्याने तो शोधतांना सर्वांचीच दमछाक होताना दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या प्रशस्त इमारतीमध्ये अनेक विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. प्रत्येक कार्यालयात पत्रव्यवहार होत असताना तो आवक-जावक कक्षाच्या माध्यमातून होतो. मात्र काही महिने हा कक्ष देखाव्यापुरता सुरू ठेवला व त्यानंतर प्रशासनाने तो बंद केला. कक्ष बंद करण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पत्रव्यवहाराचे हे मध्यवर्ती कक्ष कार्यालय बंद करून सामान्य प्रशासन विभागात हलविण्यात आले आहे. स्वतंत्र कक्ष असताना तो सामान्य प्रशासन विभागात का स्थलांतर केला? याचे उत्तरही सापडू शकत नाही. मात्र यामुळे आपली कामे किंवा पत्र घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोयच होत आहे.
प्रवेशद्वारावर इमारतींमधील कार्यालयांची माहिती व रचना सर्वसामान्यांसाठी दर्शनी भागात लावले असले, तरी नागरिकांना ही कार्यालये शोधता-शोधता दमछाक होते. त्यातच महत्त्वाचा भाग म्हणजे आवक-जावक कक्ष कुठे आहे? हे अनेकांना विचारणा करावी लागत आहे. याआधीच सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय एका कोपऱ्यात आहे. त्याच कार्यालयात एका बाजूला आवक-जावक टेबल ठेवण्यात आले आहे. तेथूनच पत्रे आदी स्वीकारली जातात. हे टेबलही लगेच दृष्टीस पडत नाही.
जिल्हा परिषदेने आवक-जावक कक्षासाठी चार कर्मचाऱ्यांची मंजुरीही घेतली आहे. मात्र स्वतंत्र कार्यालय असल्यानंतरही ते सामान्य प्रशासन विभागातील का चालवले जाते? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. आवक-जावक कक्ष सुरू करण्याची मागणी नागरिकांसह काही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.