मुंबई (प्रतिनिधी) : गुणतालिकेत तळात असलेल्या चेन्नईविरुद्ध गत सामन्यात पराभूत झालेल्या हैदराबादसमोर गुरुवारी पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचे आव्हान आहे. दिल्लीनेही आपला गेला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पराभवाची मरगळ झटकून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सुक आहेत.
हैदराबाद आणि दिल्ली हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आमने-सामने आहेत. आतापर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास पाहिला तर हैदराबादचे पारडे जड दिसते. हैदराबादने ९ सामने खेळले असून ५ सामन्यांत विजय तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात १० गुणांचा भरणा असून बुधवारच्या सामन्यापूर्वीपर्यंत हैदराबाद चौथ्या स्थानी विराजमान आहेत.
प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांच्या शर्यतीत हैदराबाद आहे. त्यामुळे चौथे स्थान टिकवून ठेवायचे असेल तर हैदराबादने दिल्लीला पराभवाचे पाणी पाजावेच लागेल. जसजसे गटातील सामने पुढे सरकत आहेत तशी स्पर्धेचीही रंगत वाढत आहे. त्यामुळे विजय मिळवून गुणतालिकेतील स्थान अधिक भक्कम करण्याचा हैदराबादचा प्रयत्न आहे.
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या संघाला चेन्नईविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण हैदराबादने हा सामना गमावला असला तरी निकोलस पुरनसारखा धडाकेबाज फलंदाज लयीत आला आहे हे त्यांच्यासाठी शुभ संकेत आहेत. विल्यमसनलाही धावा जमवण्यात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. युवा खेळाडू अभिषेक शर्माने यंदा प्रभावित केले आहे. फारसा अनुभव गाठीशी नसतानाही तो धावा जमवण्यात चाचपडत नाहीय.
यॉर्करचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा टी नटराजनने गोलंदाजींत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने बंगळूरुविरद्ध ३ षटकांत अवघ्या १० धावा देत ३ बळी मिळवले आहेत. मुंबईला पराभवाचा धक्का देत दिल्लीला यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. त्यात त्यांना सातत्य राखता आले नाही. दिल्लीने ९ पैकी ४ सामने जिंकत ५ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दिल्लीच्या गटात एकापेक्षा एक असे धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यांची फलंदाजी तळापर्यंत आहे. परंतु पृथ्वी शॉ, पंत, मार्श, वॉर्नर या हुकमाच्या एक्क्यांना धावा काढण्यात सातत्य राखता आलेले नाही. त्याचा फटका संघाच्या ताळमेळला बसत आहे.
अक्षर पटेलने गोलंदाजीसह फलंदाजीतही लक्षवेधी कामगिरी केली आहे. असे असले तरी संघाचा समतोल राखण्यात त्यांना तितकेसे यश आलेले नाही. तरीही दिल्लीचा संघ प्ले ऑफच्या रेसमध्ये आहे. त्यासाठी त्यांना आधी हैदराबादला चकवावे लागेल आणि त्यानंतरही विजयी घोडदौड कायम ठेवावी लागेल.
ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम, वेळ : रात्री ७.३० वाजता.