मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात झाडे कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी रस्ते व सोसायटी आवारातील झाडे व फांद्या छाटण्यात येतात. दरम्यान खासगी सोसायट्यांतील झाडे व फांद्या छाटणी सोसायटी स्वखर्चाने करणार नसून पालिकेने यासाठी खर्च करावा, अशी मागणी सोसायट्यांनी केली आहे. खासगी सोसायट्यांना मुंबई महापालिकेने धोकादायक झाडे व फांद्या स्वखर्चाने छाटण्याचे निर्देश दिलेले आहेत.
मात्र असे असताना खासगी सोसायट्यांतील झाडे व फांद्या छाटण्याचा खर्च पालिकेने करावेम अशी मागणी सोसायट्या करत आहेत. दरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने खासगी सोसायट्यांना याबाबत नोटीसही बजावल्या आहेत. मात्र पालिकेच्या या नोटीसीकडे सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे.
विशेष म्हणजे पावसाळीपूर्व तयारी म्हणून पालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक झाडे व फांद्या छाटण्याचे काम सुरू केले आहे. १५ मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार आहे. मात्र गृहनिर्माण सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा आदींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची असते.
एका झाडाच्या छाटणीसाठी साधारणत: ८ ते १० हजार रुपये खर्च येतो. सोसायटीमधील १० – १५ झाडे जरी छाटली तरी त्याचा खर्च लाखोंचा होतो. त्यामुळे सोसायट्यांमधील समिती या खर्चाला परवानगी देत नाही. त्यामुळे नक्की करायचे काय? असे सोसायटी सभासदांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ म्हणाले की, याबाबत महासभेत ठरावाची सूचनाही मांडण्यात आली असून यावर आयुक्तांनी लवकर निर्णय घेऊन पॉलिसी बनवणे गरजेचे आहे.
मुंबईत आम्ही ५ हजारांहून अधिक सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. पावसाळ्यात झाडे कोसळून हानी होऊ नये म्हणून पालिकेची परवानगी घेऊन छाटणी करून घायला हवी. एखादी दुर्घटना घडल्यास सोसायटीवर कारवाई होऊ शकते. – जितेंद्र परदेशी, अधीक्षक, उद्यान विभाग