Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखएसी लोकल प्रवाशांना रेल्वेचा दिलासा

एसी लोकल प्रवाशांना रेल्वेचा दिलासा

राज्यात उष्णतेची लाट जोरात सुरू आहे. मुंबईकरही उकाड्याने हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास ‘गारेगार’ करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात आले आहेत. मुंबईत एसी लोकलचे तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी केले आहेत. मुळात मुंबईत एसी लोकल सुरू झाल्या असल्या तरी त्याचे तिकीट दर खूप जास्त होते. ते परवडणारे नसल्याने अनेकदा लोकल गाडी रिकामी जाताना दिसत असते. तिकीट दर कमी करावेत, अशी मुंबईकरांची मागणी होती. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रेल्वे मंत्र्यांकडून हिरवा कंदील आल्यानंतर एसी लोकलचे दर कमी केले. त्यापाठोपाठ रेल्वेकडून लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी दुसरी मोठी आनंदाची बातमी दिली ती म्हणजे, फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये सुमारे ५० टक्के कपातीची.

मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरातील मोठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. सर्वसामान्यांना स्वस्त, परवडणारे साधन असल्याने ९० टक्के मुंबईकरांचा रेल्वेशी संबंध येतो. या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन क्षेत्रीय विभागातून ती चालवली जाते. या लोकल रेल्वेने मुंबईत सुमारे ६५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक मानली जाते. मुंबईकर चैनीसाठी नव्हे, तर गरज म्हणून प्रवास करतात. त्यामुळे अल्पमोलात व कमी त्रासाचा जो प्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो तोच ते स्वीकारतात, ही मुंबईकर प्रवाशांची मानसिकता झाली आहे.

मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था निर्माण झाली. मागील तीस-चाळीस वर्षांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या अफाट वाढल्याने त्यांचा ताण लोकल गाड्यांवर पडला होता. या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो, मोनो ट्रेनही धावू लागली. मात्र आजही मोनो आणि मेट्रोपेक्षा उपनगरीय रेल्वेसेवेवर मुंबईकर विसंबून आहेत. भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. मात्र मुंबईच्या रस्त्यावर वाहतुकीचा ताणही तितकाच अधिक होता. खासगी वाहनाने दक्षिण मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यातून तासनतास वाहनात बसून राहावे लागत होते. त्याला पर्याय म्हणून मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलला अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली होती. पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती.

खरे तर एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे; परंतु तिकीट दर जास्त असल्याने या लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती. मुंबईत एसी लोकलच्या ३४ फेऱ्या धावत होत्या. सीएसएमटीहून हार्बरमार्गे पनवेल, गोरेगावपर्यंत चालणाऱ्या ३२ वातानुकूलित फेऱ्यांपैकी १६ फेऱ्या ‘अल्प प्रतिसादामुळे’ बंद करून अंबरनाथ, कल्याणच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. वातानुकूलित एसी लोकल गाडीत मात्र दिवसाला अवघे २० ते २२ हजार प्रवासी आज असतात, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आताचा तिकीट दर कपातीचा निर्णय घेतल्यामुळे एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी रेल्वेला आशा आहे. त्यात मुंबई लोकलच्या सेवेत आणखी २३८ गाड्या २०२४ पर्यंत येतील, असे रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. मात्र तिकीट दर कमी केल्यानंतर मुंबईकरांची पसंती एसी लोकलला असू शकते. त्याचे कारणही स्वाभाविक आहे. खासगी एसी वाहनांमधून फिरणाऱ्या मंडळींकडून ओला, उबेर या टॅक्सी सेवेचा लाभ घेतला जातो आहे. त्याचा परिणाम म्हणून एकेकाळी मुंबईतल्या रस्त्यावरील काळी-पिवळी टक्सीची जागा ओला, उबेरने घेतली. मुंबईकरांना गारेगार प्रवासाची आता सवय लागली आहे. त्यामुळे लोकलच्या ताफ्यात अधिक एसी ट्रेन आल्या, तर मुंबईतील रस्त्यावरील खासगी वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. मात्र एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरातही सवलत मिळावी, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा होती; परंतु एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या भाड्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर ‘जैसे थे’ राहणार आहेत. त्यातून काही प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे. आता लवकरात लवकर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या तरी अधिक मुंबईकरांचा गारेगार प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा रेल्वे मंत्रालयाकडून बाळगण्यास हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -