Sunday, March 23, 2025
Homeदेशपंतप्रधान मोदींचे डेन्मार्कला जल्लोषात स्वागत

पंतप्रधान मोदींचे डेन्मार्कला जल्लोषात स्वागत

भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी

कोपनहेगन (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. जर्मनीनंतर आता मंगळवारी दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे डेन्मार्कला पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन स्वतः विमानतळावर पोहोचल्या होत्या. पंतप्रधान मोदी हे येथे होत असलेल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

विमानतळावर जोरदार स्वागत केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला पोहोचले. जिथे ते डेन्मार्कच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदनही जारी केले जाईल. पंतप्रधान मोदी येथे भारत-डेन्मार्क बिझनेस फोरमला संबोधित करतील.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. त्यानंतर संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्धापर्यंत ते कोरोना महामारीचा उल्लेख केला.

आपल्या जर्मनी दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, ‘माझी जर्मनी भेट अतिशय यशस्वी झाली आहे. चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी विविध मुद्द्यांवर तसेच आंतर सरकारी सल्लामसलतांवर व्यापक चर्चा झाली. मला व्यावसायिक प्रतिनिधी आणि भारतीय समुदायांतील अनेक लोकांशी संवाद साधण्याची एक चांगली संधी मिळाली.

त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी जर्मन सरकारचे आभार मानतो’. दरम्यान, डेन्मार्कमध्ये पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या भेटीव्यतिरिक्त मोदी आइसलँड, फिनलंड, स्वीडन आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला देखील उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी हे फ्रान्सला भेट देणार आहेत. तेथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -