अलिबाग (वार्ताहर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या मुरूड तालुक्यातील कोरलई येथील कथित १९ बंगले प्रकरणात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. यासंदर्भातील कच्चा ड्राफ्ट तयार झाला असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी अलिबाग येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या सोमय्या यांनी बुधवारी सकाळी अलिबागमधील १० वकिलांना निमंत्रित केले होते. ठाकरे कुटुंबियांच्या कोरलई येथील जागेवरील कथित १९ बंगल्याच्या प्रकरणाची माहिती या सर्व वकिलांना दिली तसेच माहितीच्या अधिकारात मिळवलेली कागदपत्रे सादर केली. वकिलांनी या सर्व बाबींचा अभ्यास करून सोमय्या यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सामूहिक मत नोंदवले. त्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील कच्चा ड्राफ्टदेखील तयार करण्यात आला असून आठवडाभरात त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.