नागपूर : “१८५७ च्या युद्धातही देवेंद्र फडणवीस असतील,” असा टोला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ‘मर्सिडीज बेबी’ आहे, त्यांना कधी ना संघर्ष करावा लागला आहे, ना कधी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात” अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे.
मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. १८५७ च्या युद्धामध्ये मी नक्की तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्यावेळी इंग्रजाबरोबरच युतीमध्ये असणार. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे १८५७ च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते तर सैनिकांचे बंड होते, असे म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या टीकेचा चांगलाच समाचार नागपुर मध्ये बोलत असताना घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले होते. तर ‘महाउत्सव’च्या कार्यक्रमात गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. त्याला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुनच उत्तर दिले. या दोघांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणे सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पातळीची उंची ठेवली पाहिजे. अशाप्रकारचे काही टोमणे आल्यानंतर माझे मत आहे की माझ्या पत्नीने उत्तर देण्याचे कारण नाही. अशा गोष्टी दुर्लक्ष करायल्या पाहिजेत. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यापेक्षा जास्त बोलणार नाही”
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावरुनही फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “आम्ही आधी कोर्टाची ऑर्डर समजून घेतो. पण जे प्राथमिक कळले त्यानुसार राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. दोन वर्ष झाले. प्रशासक सहा महिन्यांच्या वर असू शकत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. सरकारने ओबीसींची अपरिमित हानी केली आहे.”
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल १२ दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोह लावण्याचा करंटेपणा सरकारने केला. हा विषय न्यायालयात टिकत नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळणे स्वाभाविकच होता.”