
पुणे (वार्ताहर) : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा शरद गरुड हिने महिलांच्या ४५ किलो वजनी गटात ज्युनियर वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण १५३ लिफ्टसह सुवर्णपदक जिंकले. ग्रीसमधील हेरक्लिओन येथे आयोजित ज्युनियर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.
एकूण १५३ लिफ्टसह वेटलिफ्टर हर्षदा शरद गरुड हिने सोमवारी इतिहास रचला. महिलांच्या ४५ किलो वजनी गटात १६ वर्षांच्या हर्षदाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आठ स्पर्धकांच्या मैदानात एकूण १५३ किलो (क्लीन अँड जर्क ८३ किलो + स्नॅच ७० किलो) वजन उचलून विजेतेपद पटकावले. स्नॅचमधील ७० किलो प्रयत्नाने हर्षदाला पोडियममध्ये टॉप-ऑफ-द-पॉडियम फिनिश मिळवून दिले, तर क्लीन अँड जर्क विभागात ती दुसऱ्या क्रमांकावर होती.
इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारी हर्षदा गेल्या तीन महिन्यांपासून पटियाला येथील भारतीय सराव शिबिरात प्रशिक्षण घेत होती. त्याच वेळी तिची हेरक्लिओन ग्रीस येथील ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली. तिने ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.