वाडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना यंदाचा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार काल नाशिक येथे झालेल्या एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मात्र या पुरस्कारावर अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली असून निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतक-यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीचा कृषीभूषण पुरस्कार वाडा तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना देण्यात आल्याने अनेक शेतक-यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
कृषीभूषण या पुरस्काराचा खरा हक्कदार सर्वसामान्य शेतकरीच असायला हवा. धर्मदाय संस्थेला कृषीभूषण पुरस्कार देणे संयुक्तिक वाटत नाही. तुटपुंज्या साधनांसह व कमी गुंतवणुकीत शेतीमध्ये काबाडकष्ट करून वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरीच खरा कृषीभूषण असू शकतो, अशा प्रतिक्रिया शेतक-यांमधून उमटू लागल्या आहेत.
अलीकडेच राजेंद्र पवार यांनी कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्विकारण्यास नकार दिला होता. त्यातच आता दुसरा महत्वाचा पुरस्कार एका संस्थेला दिल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शेतक-याला कृषिमंत्र्यांनी शेतीवर संशोधन करणा-या, शेतीत नवनवीन प्रयोग करणा-या शेतक-याला पुरस्कार द्यायला हवा होता. मात्र एखादा संस्थेला हा पुरस्कार दिल्याने तो आम्हाला मान्य नसून आम्ही त्याचा निषेध करतो. -बी.बी.ठाकरे ओबीसी नेते.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणा-या एखाद्या प्रगतशील शेतक-याला सदरचा पुरस्कार दिला पाहिजे होता. असा पुरस्कार दिल्याने त्याला काही अर्थ राहिला नाही. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी.