मीनाक्षी जगदाळे
विवाहबाह्य संबंधांमुळे नेहमी महिलाच मानसिक, भावनिक, आर्थिकदृष्ट्या भरडली जाते, असे नाही तर पुरुषांनादेखील विवाहबाह्य संबंधांमधून अनेकदा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त होणे, बायको-मुलं दूर होणे याबरोबरच अपरिमित आर्थिक हानी पुरुषाचीदेखील झालेली दिसून येते.
संजय (काल्पनिक नाव) बायको आणि एकुलता एक मुलगा मागील बारा वर्षांपासून लांब आहेत. बायको मुलाला घेऊन माहेरी राहते. संजयने पाच-सहा वर्षांपूर्वी पत्नीला फारकतची कायदेशीर नोटीस पाठवली होती; परंतु पत्नी फारकत द्यायला नाही म्हटली आणि तो विषय तिथेच संपला. संजयची पत्नी नोकरी करून मुलाला शाळेत घालून मागील बारा वर्षांपासून माहेरीच स्थिरावली होती. पत्नी आणि मुलाला भेटायला मात्र संजय येत-जात असे. त्यांना शक्य तेवढी आर्थिक मदतदेखील करीत असे. पत्नीनेसुद्धा संजयला तिच्या माहेरी यायला, त्याच्याशी बोलायला, फोन करायला, त्याच्यासोबत मुलाला घेऊन कुठेही बाहेर जायला-यायला कधीही बंदी घातली नव्हती; परंतु संजयची पत्नी कायमस्वरूपी त्याच्या घरी येऊन राहायला किंवा मुलाला त्याच्याकडे पाठवायला अजिबात तयार नव्हती. संजयला पत्नी आणि मुलाने कायमस्वरूपी परत त्याच्याकडे येण्यासाठी काय प्रयत्न करावेत यासंदर्भात मार्गदर्शन हवे होते.
समुपदेशनला आलेला संजय आता अंदाजे चाळीस वर्षांचा होता आणि बारा वर्षांपासून त्याचा संसार पत्नी आणि मुलगा असूनदेखील झालेला नव्हता. लग्नानंतर दोनच वर्षांत मुलगा लहान असताना पत्नी त्याला घेऊन कायमची माहेरी निघून गेली होती आणि संजय आजमितीला खूपच खचलेल्या अवस्थेत दिसत होता. संजयची तब्येत उतरलेली दिसत होती आणि आर्थिक अवस्थासुद्धा बिकट जाणवत होती. वास्तविक संजयचे करिअर पाहिले तर ते अतिशय उच्च दर्जाचे, उच्चशिक्षित, बुद्धिमान व्यक्ती करू शकेल असे ते क्षेत्र होते. संजयने स्वतःच्या क्षेत्रात खूप मेहनत, प्रगती केली होती. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या गाठी होता. मोठं नावलौकिक त्याने सामाजिक स्तरावर कमावले होते; परंतु वैवाहिक, आर्थिक बाबतीत संजय स्वतःला सपशेल अपयशी समजत होता. संजयने मागील बारा वर्षांचा प्रापंचिक आढावा थोडक्यात सांगितला तेव्हा त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यामागील कारण हे त्याचेच विवाहबाह्य संबंध होते. हे संबंध आता पूर्णपणे संपुष्टात आले होते; परंतु संजयला मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करून गेले होते. झाले असे होते की, बारा वर्षांपूर्वी संजयच्या आयुष्यात त्याच्याच कार्यालयात काम करणारी सोनी (काल्पनिक नाव) अविवाहित मुलगी आली होती.
सोनी दुसऱ्या छोट्या शहरातून नोकरीनिमित्ताने आल्यामुळे तिच्या राहण्याची, जेवण्याची व्यवस्था संजयने स्वतःच्याच एका छोट्या घरात केली होती. कार्यालयीन कामात हुशार असल्यामुळे संजयच्या प्रगतीला अपेक्षित असा हातभार लावण्यामुळे सोनी अल्पावधीत संजयसाठी महत्त्वाची बनली होती.
सोनीने कामाच्या सर्व जबाबदाऱ्या लीलया पेलल्या होत्या आणि संजयचं आता तिच्याशिवाय पान हालत नव्हतं. साहजिकच दोघांमध्ये होत असलेली अतिजवळीक संजयच्या पत्नीला खटकू लागली होती आणि दोघांमध्ये विवाद सुरू झाले होते. संजयची पत्नीसुद्धा उच्चशिक्षित, सुशिक्षित घरातील असल्यामुळे ती संजयला व्यावसायिक कामात हातभार लावत होतीच. संजयला मात्र आता सोनी जास्त जवळची झाल्यामुळे तो कार्यालयीन कामकाजात पत्नीचा सतत अपमान करणे, तिला कमी लेखणे, कामात चुका काढणे या पद्धतीने वागत होता. प्रापंचिक आयुष्यातसुद्धा पत्नीला तो किंमत देत नव्हता. न तिच्याशी कोणतेही पती-पत्नीचे संबंध ठेवत होता. तरीदेखील पडती भूमिका घेऊन पत्नी त्याला सोनीपासून लांब होण्याची विनंती करीत होती. आता संजयने सोनीला ज्या ठिकाणी वास्तव्यास ठेवले होते त्याठिकाणी स्वतः मुक्कामी राहणे, तिला स्वतःच्या राहत्या घरी पत्नी नसताना अथवा असतानादेखील आणणे, स्वतःच्या घरात हक्काने वावरू देणे, घरगुती विषयात, कार्यक्रमात सहभागी होऊ देणे खूप वाढले होते. संजयच्या पत्नीचा संयम दिवसेंदिवस संपत चालला होता. आपल्या डोळ्यांसमोर पतीचे असे अनैतिक संबंध सहन करणे तिला अशक्य होत होते. अनेक ठिकाणी संजयच्या पत्नीला सोनी आणि संजयचे वागणे-बोलणे खटकत होते. दोघांमधील शारीरिक संबंधांचे पुरावेदेखील पत्नीच्या हाती लागले होते. संजयला याचा जाब विचारला असता तो पत्नीशी भांडण, त्रागा करणे, घरातून चालती हो म्हणणे, घटस्फोट घे असे म्हणून मानसिक त्रास देत होता. काहीही झाले तरी सोनीला सोडणार नाही, वाटल्यास तू कायमची चालती हो हीच भाषा संजयची वेळोवेळी होती.
सोनी-संजयचे राजरोस आपल्यासमोर उघड उघड सुरू असलेले अनैतिक संबंध सहन न होऊन, एक वर्ष सर्व प्रकार डोळ्यांसमोर सहन करून अखेर कंटाळून संजयची पत्नी आता त्रासून गेली होती आणि त्यामुळेच तिने मुलाला घेऊन घर सोडले होते.
आता तर संजयला कोणतीही अडकाठी राहिली नव्हती. बायकोला परत आणण्यासाठी ना संजयने काही प्रयत्न केले, ना झालेल्या प्रकरणाबाबत त्याला काही पच्छाताप होता. आता सोनीला संजय थेट आपल्या राहत्या घरी घेऊन आला आणि दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. संजयचे राहते घर भाड्याचे असल्यामुळे घरमालकांनी त्याला घर सोडायला सांगितले. कारण आजूबाजूच्या लोकांनी संजयने बाहेरची बाई घरात आणून ठेवली आहे, अशी तक्रार केली होती.