Wednesday, September 17, 2025

सहनशक्ती ही फार मोठी शक्ती

आपल्या जीवनांत सहनशक्ती ही फार मोठी शक्ती आहे. सहनशक्ती असेल तर ती तुम्हाला संकटातून पार करेल व प्रगतिपथावर घेऊन जाईल. पुष्कळ लोकांचा संसार उद्वस्त होतो, दुःखाचा होतो, पुष्कळ लोकांचा संसार केवळ नांवाला चाललेला असतो पण त्या चालण्याला काही अर्थ नसतो. परमार्थ तर नसतोच नसतो. पण नुसता अनर्थ भरलेला असतो. चलती का नाम गाडी म्हणतात तसा तो चाललेला असतो. क्षुल्लक कारणावरून चिडचिड होते. ही जी चिडचिड होते त्याचे कारण सहनशक्तीचा अभाव. तुम्ही चिडलात तर गप्प तरी राहा. तुम्हाला राग आला असेल, तुमची चिडचिड झाली असेल तर अ वेळी काय करायचे? अ वेळी तुम्ही ही प्रार्थना म्हणा.

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे। सर्वांना सुखांत, आनंदात, ऐश्वर्यात ठेव। सर्वांचे भले, कर कल्याण कर, रक्षण कर। आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे।

राग कुठल्या कुठे जाईल. ती चिडचिड कुठल्याकुठे पळून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. आपल्याला राग आला आहे हे तुम्हाला कळते. राग हा काही पटकन येत नाही, तर तो तुम्हाला कळतो तेव्हा प्रार्थना म्हणा. मोठ्याने म्हणा नाहीतर मनातल्या मनात म्हणा. मोठ्याने म्हणणे चांगले. क्षुल्लक कारणासाठी तुम्ही चिडता किंवा क्षुल्लक कारणासाठी तुम्ही रागावता. दरवाजा उघडायला वेळ झाला म्हणून चिडणे. घरातले लोक कुठेतरी बिझी असतील. दरवाजा उघडायला वेळ झाला म्हणून घर डोक्यावर घेणे हे शहापणाचे लक्षण नाही. तुम्ही समजून घेतले पाहिजे की घरातले लोक काहीतरी कामांत असले पाहिजेत. दरवाजा उघडला नाही म्हणून आका कोसळले का की धरणी दुभंगली. तुम्ही येण्याआधी दरवाजा उघडायला तुम्ही कोण गव्हर्नर आहात का? सासू-सुनांची क्षुल्लक कारणांवरून भांडणे होतात. कारण कितीतरी क्षुल्लक असते. मुलगा व बाप यांचे क्षुल्लक कारणावरून भांडण होते. क्षुल्लक कारणावरून अहंकार जागृत होतो. किंबहुना अहंकाराचे दृय रूप म्हणजे राग. अहंकाराचे दृय रूप म्हणजे क्रोध. क्रोध हे अहंकाराचे प्रत्यक्ष दर्शन आहे. अहंकार डोळ्यांना दिसत नाही पण त्याचे दर्शन चिडचिडीतून होते. क्रोध ज्यावेळेला येतो त्यावेळी लक्षांत ठेवले पाहिजे की हा क्रोध अत्यंत वाईट आहे. जर क्रोध आवरलात व प्रार्थना म्हटली तर फार मोठ्या संकटांतून पार व्हाल. सासू-सुनांची भांडणे क्षुल्लक कारणांवरून होतात. क्षुल्लक कारणावरून सासूला अपमान झाल्यासारखा वाटतो. त्यातून तिला राग येतो. शब्दाने शब्द वाढत जातात आणि मुलगा व बाप वेगळा होतो. भांडले कोण? सासू-सुना व वेगळे कोणाला व्हावे लागले? मुलगा व बापाला. तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तेव्हा तुम्ही बॉस वाट्टेल ते बोलतो, तुमच्या अंगावर फाईलही फेकतो ते तुम्ही सहन करता की नाही?

- सद्गुरू वामनराव पै

Comments
Add Comment