मुंबई : राज्यातील मशिदींवरील भोंग्यावरून वातावरण चांगलेच तापलेले असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊतांनी राज ठाकरे यांना तुम्हाला हिंदुत्त्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या, त्यांची डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत, असे विधान केले होते. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी या विधानावर राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व भोंगे बंद करा म्हणजे काय? राज ठाकरेंनी डोकं ठिकाणावर ठेवून वक्तव्य करावीत. तुम्हाला हिंदुत्त्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या, त्यांची डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत. असे म्हटले होते. त्यावर टीका करताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचे धडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून गिरवले आहेत… त्यांची हिंदुत्वाची डिग्री बोगस होती, त्यांनी चुकीचे धडे शिकवले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सर्वज्ञानी संपादक जी…’ असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.