Monday, July 22, 2024
Homeक्रीडाबंगळूरु हिशेब चुकता करेल?

बंगळूरु हिशेब चुकता करेल?

आज चेन्नईशी गाठ; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक

मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटमध्ये किंवा इतर कोणत्याही खेळात, जेव्हा दोन बलाढ्य आणि समान कामगिरी करणाऱ्या संघांचा सामना होतो, तेव्हा होणारा खेळ हा डोळ्यांचे पारणे फिटेल असा जबरदस्त असतो; परंतु जेव्हा विशिष्ट कमकुवत दुवे असलेले दोन संघ जेव्हा एकमेकांच्या विरोधात येतात, तेव्हा स्पर्धा अधिकच उत्कंठावर्धक होते. आज आयपीएलच्या १५व्या मोसमातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असेच दोन संघ आमने-सामने येतील, जे एकमेकांच्या कमकुवत बाजू हेरून खेळण्याचा प्रयत्न करतील. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि चेन्नई किंग्ज यांच्यात आज अटीतटीचा सामना रंगणार आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपदी पुनरागमन झाल्यानंतर पहिलाच सामना जिंकल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच वेळी, बंगळूरुही हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईने केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

उभय संघांच्या कमकुवत बाजूंचा विचार केल्यास चेन्नईची सर्वात मोठी कमजोरी गोलंदाजी आहे, तर याउलट आरसीबीची डोकेदुखी असातत्यपूर्ण फलंदाजीने वाढवली आहे. आरसीबीसाठी आतापर्यंतच्या १० सामन्यांमध्ये फक्त ६ अर्धशतके झाली आहेत. त्यापैकी २ कर्णधार फाफ डू प्लेसिसने केली आहेत. या सामन्यापूर्वी बंगळूरुने सलग ३ सामने गमावले आहेत. महेंद्रसिंग धोनी कर्णधार होताच गत सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. दुसरीकडे, गेल्या सामन्यात बंगळूरुला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आरसीबी ५ सामने जिंकून १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर गतविजेत्या चेन्नईने ९ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत धोनीच्या संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बंगळूरुविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.

गेल्या सामन्यातील विराट कोहलीच्या स्पर्धेतील पाहिल्या अर्धशतकानंतर हा सामना अधिक रोमांचक होणार आहे. त्याच वेळी महेंद्रसिंग धोनीने चेन्नईची कमान हाती घेतल्यानंतर हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आहे, त्यामुळे तो विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी होतो का?, हेही पाहावे लागेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकूण ३० वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात चेन्नई १९ विजयांसह आघाडीवर आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी रुतुराज गायकवाड आणि तिक्षणा, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हर्षल पटेल आणि विराट कोहली हे प्रमुख खेळाडू असतील. रुतुराज विरुद्ध जोश हेझलवूड तसेच तिक्षणा आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्वयुद्ध या सामन्याच्या निकालासाठी परिणामकारक ठरू शकते. चेन्नईची खराब गोलंदाजी विरुद्ध बेंगळूरुची खराब फलंदाजी असा हा सामना रंगेल, असे दिसते.

चेन्नई संघात होऊ शकतो बदल!

बंगळूरु सलग ३ सामने हरले असले तरीही आपल्या त्याच संघासोबत खेळू शकतो; परंतु चेन्नईबाबत सांगायचे, तर सलामीवीर रुतुराज फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे, तसेच कॉनवेने दुसऱ्या सलामीवीराची अडचण दूर केली आहे. कर्णधारपदाचे ओझे उतरल्यामुळे रवींद्र जडेजाही मोकळेपणाने खेळू शकेल तसेच रॉबिन उथप्पा, शिवम दुबे आणि अंबाती रायुडू सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने संघाच्या फलंदाजीला डेप्थ मिळत आहे. दुखापतीमुळे दुबे शेवटच्या सामन्यात खेळू शकला नसला तरी आज तो पुनरागमन करेल. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होही गेल्या सामन्यातून बाहेर असल्याने त्याचे पुनरागमनही निश्चित आहे. अशा स्थितीत मिचेल सँटनर आणि सिमरजीत सिंग यांना बाहेर बसावे लागू शकते.

ठिकाण : एमसीए स्टेडियम, पुणे. वेळ : रात्री ७.३० वाजता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -