Monday, January 20, 2025
Homeमहामुंबईसंपानंतर लालपरी सुस्साट

संपानंतर लालपरी सुस्साट

महिनाभरात कमावले २६९ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी बसेसची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असून कर्मचाऱ्यांच्या संपानंतर बसेस पुन्हा एकदा रस्त्यांवर धावताना दिसू लागल्या आहेत. ऐन सुट्टीच्या आणि लग्नसराईच्या मे महिन्याच्या दिवसांत एसटी बसेस धावू लागल्यामुळे गावागावांतील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नातही कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्येच एसटीने २६९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुमारे पाच महिन्यांहून अधिक काळ संपावर गेल्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ९६ टक्क्यांहून अधिक एसटी कर्मचारी आता कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर एसटी पुन्हा धावू लागली आहे. सध्या एसटीची प्रवासी संख्या २२ लाखांवर गेली आहे. यातून महामंडळाच्या तिजोरीत प्रतिदिवस सरासरी १३ कोटींचा महसूल जमा होत आहे. गेल्या महिन्यात प्रथमच एसटी महामंडळाने २६९ कोटी ५९ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपासून संप पुकारला होता. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठ्या प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महामंडळात ८३ हजार कर्मचारी हजर झाले आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून प्रत्येक दिवशी २१ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. राज्यभरात १२ हजार ५८६ एसटी बसेसमार्फत ३१ हजार ५०० पेक्षा अधिक एसटीच्या फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या २२ लाखपर्यंत पोहोचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचे महसूल मिळत आहे.

चार हजार एसटी बस नादुरुस्त

सध्या महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार एसटी बसेस आहेत, त्यापैकी १२ हजार एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसेच ४ हजार बसेस वेगवेगळ्या कारणाने आगारात बंद पडून आहेत. त्या लवकरात लवकर दुरुस्त करून मार्गस्थ करणे हे यांत्रिक कर्मचाऱ्यांपुढील महत्त्वाचे आव्हान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -