Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाटायटन्स ठरणार अंतिम चारमध्ये पाऊल ठेवणारा पहिला संघ?

टायटन्स ठरणार अंतिम चारमध्ये पाऊल ठेवणारा पहिला संघ?

पंजाबसमोर आज तगड्या गुजरातचे आव्हान

मुंबई (प्रतिनिधी) : गुजरात टायटन्स सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून आपल्या पहिल्याच हंगामात खेळताना आयपीएल २०२२ च्या पॉइंट्स टेबलवर राज्य करत आहे. त्यामुळे पंजाब किंग्जसमोर गुजरातच्या रूपात तगडे आव्हान असेल. गुजरातने ९ सामन्यांत ८ विजय मिळवून प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले असून आता त्यांचे लक्ष्य हा सामना जिंकून नि शीर्षस्थान मजबूत करून अधिकृतरीत्या अंतिम चारमध्ये जाणारा पहिला संघ बनण्याचे आहे.

आज मंगळवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवरील सामन्यात गुजरात टायटन्स व पंजाब किंग्ज एकमेकांना सामोरे जातील. टायटन्स व किंग्ज यंदाच्या हंगामात एकमेकांविरुद्ध एक सामना खेळले आहेत. अगदी अंतिम चेंडूपर्यंत रंगलेल्या त्या सामन्यात गुजरातने लक्ष्याचा पाठलाग करून पंजाबवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

गुजरात टायटन्सने अंतिम चारमध्ये जाणारा पहिला संघ होण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना, पंजाब विजय मिळवून पुन्हा जुन्या लयीत येण्यास उत्सुक आहे. जेणेकरून ते लीग टप्प्यातील काही सामने शिल्लक असताना प्ले-ऑफमध्ये सामील होऊ शकतील. कारण, सातव्या स्थानी असले तरी अजूनही त्यांना अंतिम चारमध्ये जाण्याची संधी आहे. तथापि, प्ले-ऑफसाठी पात्र ठरायचे असल्यास पंजाब किंग्जला आता सर्वोत्तम खेळ करावाच लागेल.

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाबनेही मोसमाची दमदार सुरुवात केली होती; परंतु ते सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहेत. पंजाब किंग्जसाठी शिखर धवनने ९ सामन्यांत सर्वाधिक ३०७ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ लियाम लिव्हिंगस्टोनने २६३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, कगिसो रबाडाने संघासाठी सर्वाधिक १३, तर राहुल चहरने १२ बळी घेतले आहेत आणि गुजरातसाठी कर्णधार हार्दिक पंड्याने ८ सामन्यांत ३०८ धावा, तर डेव्हिड मिलरने ९ सामन्यांत २७६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमीने संघाकडून सर्वाधिक १४ विकेट्स, तर लॉकी फर्ग्युसनने १० विकेट्स घेतल्या आहेत आणि राशिद खाननेही ९ बळी घेत त्यांना उत्तम साथ दिली आहे.

ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम,  वेळ : रात्री ७:३० वाजता

गुजरातचा शेवटच्या षटकांमधील थरार!

आपल्या पहिल्या मोसमात खेळणारा नवीन संघ गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत पाच सामन्यांत शेवटच्या षटकात विजय मिळवला आहे. त्यांनी दोनदा शेवटच्या चेंडूवर आणि एकवेळा केवळ एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला आहे. याला नशीब म्हणा किंवा राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर आणि राशिद खान या खेळाडूंची चमकदार फिनिशिंग क्षमता म्हणा; पण गुजरातने स्पर्धेच्या पहिल्याच वर्षात सर्वच आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांना मिळालेल्या ८ विजयांपैकी ७ सामन्यांत वेगवेगळे खेळाडू सामनावीर ठरले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -