मशिदींवरील भोंगे खाली उतरले नाहीत, तर ४ तारखेपासून मी ऐकणार नाही, असा सज्ज़ड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील विराट सभेत दिला. राज ठाकरे यांच्या मुंबई आणि ठाणे येथील सभांनी राज्यात अगोदर वातावरण तापले होते. मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे हे त्यांचे सध्या टार्गेट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन हे भोंगे सरकारने खाली उतरवावेत अशी त्यांची मागणी आहे. मशिदींवरील भोंगे खाली उतरवा ही मागणी काही नवीन नाही. राज ठाकरे यांनीही यापूर्वी तशी मागणी केली आहेच. मग आताच या मागणीसाठी त्यांनी पक्षाची ताकद का पणाला लावली आहे, हा खरा प्रश्न आहे. राज्यात व देशात अनेक सरकारे आली व गेली. वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली. पण कोणत्याही सरकारने मशिदींवरील भोंगे या विषयाकडे गांभीर्याने बघितलेले नाही. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तो मुस्लीम समाजाला नसून तो ठाकरे सरकारला आहे. मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. आपल्याला दंगली घडवायच्या नाहीत, असे राज ठाकरे सतत सांगत आहेत. पण ज्या पद्धतीने ते भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम देत आहेत ते बघता, ४ तारखेनंतर राज्यात भोंगे खाली उतरविण्याच्या मुद्द्यावरून कुठेही काही घडले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरून मोठे वादविवाद सुरू झाले आहेत. या भाषणात शरद पवार आणि मशिदींवरील भोंगे हे दोन प्रमुख मुद्दे होते. महाराष्ट्रात शरद पवारांमुळेच जातीपातीचे राजकारण वाढत गेले याचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला. पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या वृद्धापकाळात जेम्स लेनवरून त्रास दिला हे सांगताना त्यांनी इंग्रजी साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली जेम्स लेनची मुलाखत पडद्यावर दाखवून वाचून दाखवली.
शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी सभांमधून घेत नव्हते, असे सांगून पवारांना हिंदू धर्माची अॅलर्जी आहे असाही त्यांनी आरोप केला. उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे खाली उतरवले जाऊ शकतात. मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला. राज ठाकरे यांच्या सभेला विराट गर्दी होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेतील गर्दीची तुलना पूर्वीच्या काही दिग्गजांच्या सभांशी केली गेली. या सभेचे थेट प्रक्षेपण राज्यातीलच नव्हे, तर अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी केले होते. त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात युद्ध पुकारले आहे म्हणूनच त्यांच्या भाषणाला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. ४ तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर दु्प्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण होईल, असा त्यांनी इशारा दिला आहे. ३ मे रोजी इद आहे. म्हणूनच ४ मेनंतर आपण कोणचेही या मुद्द्यावर ऐकणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या राज यांच्या सभेला मीडियाने अगोदरपासून मोठी प्रसिद्धी दिली होती. सभा होणार की नाही, पोलिसाची परवानगी मिळणार की नाही, अशी चर्चा चार दिवस अगोदरपासून होती. पण पोलिसांनी अटी व शर्ती घालून तसेच औरंगाबादमध्ये जमावबंदी आदेश जारी करून या सभेला संमती दिली होती. भोंगे उतरविण्यासंबंधी ठाकरे सरकारने गोलमाल भूमिका घेतली आहे. भोंग्यासाठी परवानगी घेण्यासाठी पोलीस ठाण्यावर आता रांगा लागतील. पण ज्यांनी आजवर कधीच परवानगी घेतली नव्हती त्यांचे काय करणार हा कळीचा मुद्दा आहे. सगळे भोंगे अनधिकृत आहेत, म्हणूनच आता थांबणे नाही अशी मनसेची भूमिका आहे. ‘अभी नही तो कभी नही…’ असे स्वत: राज ठाकरे यांनीच म्हटले आहे. सरळ सांगून होत नसेल तर पुढे काय होईल हे सांगता येत नाही…, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांची सभा चालू असताना मशिदीवरील भोंग्यावरून अजान आवाज आला आणि त्या क्षणाला राज कमालीचे संतप्त झालेले दिसले. ताबडतोब ते बंद करा, असे त्यांनी पोलिसांना उद्देशून सांगितले. सभेच्या वेळी बांग दिली जाणार असेल, तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा अशा भाषेत त्यांनी सुनावले आणि काही क्षणातच त्यांनी त्यांचे भाषण आवरते घेतले. रस्त्यावर नमाज पढायला तुम्हाला कोणी अधिकार दिलाय असा प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी नव्या युद्धाला तोंड फोडले आहे.
४ तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले तरी रस्त्यावर नियमित पढला जाणारा नमाज अचानक बंद कसा होणार? मुंबईत अनेक प्रमुख रस्त्यांवर आणि उपनगरी रेल्वे स्थानकांच्या बाहेर वर्षानुवर्षे नमाज पढला जातो. त्याला ना कुणाची परवानगी आहे, ना कोणाचा विरोध होता. रस्त्यावरील नमाजाला विरोध हा जर मनसेचा पुढचा कार्यक्रम असेल, तर ठाकरे सरकारला पाठोपाठ परीक्षांना तोंड द्यावे लागणार आहे. राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यात शिवसेना हे टार्गेट ठेवले होते. आता औरंगाबादमध्ये शरद पवार हे टार्गेट केले. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंबंधी अल्टिमेटम देत असतानाच बाजूच्या भोंग्यावरून बांग आल्याने त्या विरोधात सज्ज़ड दम देताना त्यांचा तोल सुटला की काय असे अनेकांना वाटले….
४ तारखेनंतर राज्यात काही विपरीत घडले व कायदा-सुव्यवस्था ढासळली तर त्याची जबाबदारी कोणावर…?