मोनिश गायकवाड
भिवंडी : मे महिना सुरू झाल्याने उष्णता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून भिवंडीत वन्य प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे अनेक आजार या उष्णतेमुळे निर्माण होत आहेत.
त्याचप्रमाणे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांचेसुद्धा या उष्णतेमुळे मोठे हाल होत असतात. त्यामुळे पाण्याची पातळी अनेक ठिकाणी कमी होत असतानाच पशुपक्ष्यांना या पाण्यासाठी जंगलात फिरावे लागत असल्याने पशुप्रेमींनी भिवंडी तालुक्यातील वनविभागाचे वनपाल साहेबराव खरे यांनी पशु मित्रांसोबत डोंगर पठारावरील अनेक भागात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत.
जेणेकरून या पाणवठ्यामध्ये पाणी जमा करून जंगलातील पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी होईल. त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. अनेकांनी आपल्या जवळपास असलेल्या झाडांवर व झाडाखालीसुद्धा पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आव्हानसुद्धा साहेबराव खरे यांच्या कडून करण्यात आले आहे.
त्याने भिवंडी तालुक्यातील विश्व गड ग्रामस्थांकडून विश्व गड डोंगरावर खोदकाम करून अनेक पाणवठे तयार करण्यात आले आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून कोरडे पाडा येथील विश्वगड डोंगरावर खोदकाम करून पाणवठे तयार करण्यात आले आहेत.