सिन्नर (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील वावी येथे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी घरातील नागरिकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून आम्हाला झोपून ठेवल्याचे घरमालक सुनील वर्पे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वावीच्या खळवाडी येथे राहणारे सुनील बबन वर्पे हे पत्नी व मुलांसह त्यांच्या खोलीत झोपले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला. नंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून कपाटातील रोख २२ हजार रुपये व सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मुलांच्या हातापायातील चांदीचे दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच भागात राहणारे आश्रमशाळेतील कर्मचारी गावीत यांच्या घराकडे वळविला.
गावीत यांच्या घराचे कुलूप तोडत असताना ग्रामस्थांनी जाग आल्यानंतर आरडाओरड केली. त्यावेळी चोरट्यांनी पळ काढला. पहाटे चार वाजेच्या सुमारास वर्पे दाम्पत्याला मळमळ होऊन जाग आली. त्यावेळी घरातील कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून चोरी झाल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सोनवणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे पसार झाले. सकाळी हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप, नितीन मैंद यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.सध्या वावी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे वाढत असून त्याला आळा घालणे गरजेचे आहे.
गेल्या एक महिन्यात वावी पोलीस स्टेशन हद्दीत सिन्नर शिर्डी महामार्गावर होणाऱ्या चोऱ्या तसेच गावात होणाऱ्या चोऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने चोरांचे फावले जात आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून चोरीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.