Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमी"राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचे बोला"

“राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचे बोला”

शेलारांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून चीनने लावलेल्या भोंग्यांबाबत शिवसेनेने प्रश्न उपस्थित केला आहे. यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी खोचक शब्दांत टीका केली. “राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी किती लागली हे मोजण्याचा प्रकार आहे. चीनचे सोडा आधी चिराबाजारमधील भोंग्यांचे बघा. भोंगे उतरवण्याबाबत शिवसेनेची बोटचेपी भूमिका आता लपून राहिलेली नाही. देव, धर्म आणि देश गेला कुठे? आधी मंदिर मग सरकार ही शिवसेनेची भूमिका कुठे गेली?”, असे आशिष शेलार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याचे क्लासेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यावेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

“संजय राऊत बोलतात म्हणून आम्ही अनुशासन कधीच पाळणार नाही. ते पलटी मारणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते बनले आहेत. राज्यात गेल्या अडीच वर्षात तानाशाही सुरू असून सरकार केवळ सूड भावनेतून वागत आहे. चुन चुन के बदला लेंगे, हिच प्रवृत्ती सरकारची दिसून आली आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक केली जाते. खासदार-आमदारांना अटक केली जाते. कोणताही गुन्हा केलेले नसताना आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली जाते. हे सरकार तानाशाही सरकार असून जनता याला लोकशाही माध्यमातून सडेतोड उत्तर देईल”, असे आशिष शेलार म्हणाले.

हनुमान चालिसा लावण्यासाठी राज ठाकरे आक्रमक झाल्याने भाजपाचे नेतेही यात सहभागी होऊ शकतात. या अर्थी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी नोटीस पाठवण्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपर आणि कुलाबा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा कशातही सहभाग नसताना त्यांना पोलिसांनी कोणत्या संविधानिक अधिकाराखाली नोटीस पाठवली, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. नाहीतर आम्ही कोर्टात जावू, असे शेलार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -