
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितले.
राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३० हजार होमगार्ड राज्यात तैनात केले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ तुकड्याही तैनात आहेत. राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक एकोप्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रातील जनतेने शांतता सुव्यवस्था राखावी असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे.
कायद्याचा सन्मान राखणारे आम्ही लोक आहोत – मनसे नेते बाळा नांदगावकर
मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस दिली आहे. त्याचे स्वागत आहे. कायद्याचे पालन राखणारे आम्ही आहोत. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले आहे. त्यांचा मानसन्मान राखायला हवा. ईद हा मुस्लीम बांधवांचा सण आहे. आमचे त्याला काहीच म्हणणे नाही. बाळा नांदगावकरमुळे समाजाला त्रास होत असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. कायदा मोडणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.